ऑनलाइन लोकमत
पटना, दि. 5 - एक फूल दोन माली हा वाकप्रचार तुम्ही ऐकला असेलच. तसेच या नावाचा चित्रपटही पाहिला असेल. पण बिहारमधील दरभंगा पोलीस ठाण्यातील पोलीस अशाच एका विचित्र प्रकरणाचा गुंता सोडवण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. या ठाण्यात दाखल झालेल्या एका प्रकरणात एका महिलेवर तिच्या तीन पतींनी हक्क सांगितला आहे.
या प्रकरणातील मुख्य व्यक्ती राधिका नामक महिला असून, तिने आतापर्यंत तीन विवाह केले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या महिलेचे पहिले लग्न कुटुंबीयांनी संजय झा नामक तरुणाशी जबरदस्तीने लावून दिले होते. त्यामुळे नाखूश असलेली राधिका विवाहाला काही दिवस होत नाही तोच सासरहून गायब झाली.
याचदरम्यान तिची ओळख मोहन सिंग याच्याशी झाली. त्यानंतर तिने मोहन सिंगशी विवाहदेखील केला. या दोघांनाही एक मूलदेखील झाले. पण दुसऱ्या पतीसोबतसुद्धा ती फार काळ नांदू शकली नाही. त्यानंतर येथूनही ती गायब झाली. पुढे राधिकाची ओळख शिवशंकर राय या इसमाशी झाली. एकमेकांच्या प्रेमात पडलेल्या या दोघांनीह विवाहसुद्धा केला. विशेष म्हणजे शिवशंकरसुद्धा आधीपासून विवाहित होता. पण तरीसुद्धा दोघेही एकमेकांना सोडू इच्छित नाहीत.
राधिकासाठी शिवशंकर आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट देण्यास तयार आहे. पण राधिकाचा दुसरा पती मोहन मात्र तिला सोडण्यास तयार नाही. राधिकाने मुलाचा ताबा तरी आपल्याकडे द्यावा अशी मोहनची मागणी आहे. पण, त्यालाही तिने नकार दिला आहे. त्यामुळे या प्रकरणात काय निर्णय द्यावा हा प्रश्न पोलिसांना पडला आहे. गुंता वाढल्याने पोलिसांनी हे प्रकरण न्यायालयात नेण्याचा निर्णय घेतला आहे. पण या विचित्र प्रेमप्रकरणामुळे एकाच वेळी अनेक कुटुंबांना चिंतेत टाकले आहे. आता या विचित्र प्रकणावर न्यायालय काय निर्णय देते. हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.