नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानाला आजपासून सुरुवात झाली आहे. त्यामुळे, मतदारांनी अपना टाईम आ गया है, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कारण, देशाच्या संसदेत आपला लोकप्रतिनिधी पाठविण्यासाठी सर्वसामान्य नागरिक आज मतदानाचा हक्क बजावणार आहे. याच मतदार राजाचे काही मतदान केंद्रावर ढोल-नगारे, तुता-या वाजवून तसेच काही ठिकाणी गुलाबाचे फूल देऊन तर कोठे औक्षण करून स्वागत करण्यात येत आहे.
उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यात बडौत शहरातील एका मतदान केंद्रावरील व्हिडिओ समोर आला आहे. या मतदान केंद्रावर मतदारांचे स्वागत ढोल वाजवून करण्यात येत आहे. तसेच, याठिकाणी मतदारांवर फुलांचा वर्षाव करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात देशातील 18 राज्ये आणि दोन केंद्र शासित प्रदेशांतील 91 मतदारसंघांत आज मतदान होत आहे. महाराष्ट्रातील विदर्भात असलेल्या 10 पैकी 7 मतदारसंघामध्ये मतदान सुरु आहे. यामध्ये नागपूर, रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा-गोंदिया, यवतमाळ-वाशीम आणि वर्धा मतदारसंघाचा समावेश आहे.