युद्धाच्या धुमश्चक्रीत भारत-पाक मैत्रीचे फूल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2022 07:48 AM2022-03-07T07:48:10+5:302022-03-07T07:48:23+5:30

अंकित हा भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकलेला होता. कीव्ह येथील पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये तो शिक्षण घेत आहे. 

Flowers of Indo-Pak friendship in the midst of war in Ukraine | युद्धाच्या धुमश्चक्रीत भारत-पाक मैत्रीचे फूल

युद्धाच्या धुमश्चक्रीत भारत-पाक मैत्रीचे फूल

Next

रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये युद्ध सुरू झाल्यानंतर तिथून बाहेर पडणाऱ्या नागरिकांचे किती हाल होताहेत,हे आपण रोजच्या रोज बघतो आहोत. अनेक भारतीय मुलांना तर सैनिकांच्या हातचा बेदम मारही खावा लागला. अन्न नाही,पाणी नाही, अंगावर केव्हाही बॉम्ब पडेल अशी धास्ती घेऊन अनेक जण या दोन्ही देशातून पलायनाचा प्रयत्न करीत आहेत. सरकारतर्फे ही सुटकेचे प्रयत्न सुरू असले, तरी त्यांनाही आपल्या नागरिकांना सोडवणं अवघड जात आहे. युद्धामुळे युक्रेनमध्ये सगळ्याच देशाच्या विमानांना बंदी आहे. त्यामुळे काहीही करून पोलंड सारख्या शेजारच्या देशांमध्ये पोहोचणं ही अडकलेल्या नागरिकांची आणि विद्यार्थ्यांचीच जबाबदारी झाली आहे. 

युद्धाच्या या वातावरणात अनेक देशांच्या निष्पाप विद्यार्थ्यांना आपला जीवही गमवावा लागला असला तरी बहादुरीच्या अनेक कहाण्याही ऐकायला येत आहेत. त्यातलीच एक कहाणी आहे, हरयाणातील एका लढवय्या तरुण विद्यार्थ्याची... भारत आणि पाकिस्तान या दोन देशांचे राजकीय वैमनस्य कितीही टोकाला पोहोचलेले असले, तरी भारतीय आणि पाकिस्तानी नागरिकांमध्ये मात्र किती गाढ स्नेहाचे संबंध आहेत, हे दर्शवणारी ही हृदयस्पर्शी कहाणी! हरयाणाच्या हिसारचा रहिवासी असलेल्या अंकितने आपल्या धाडसानं या स्नेहाची, प्रेमाची आणि दोस्तीची चुणूक नव्यानं दाखवून दिली आहे. 

अंकित हा भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकलेला होता. कीव्ह येथील पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये तो शिक्षण घेत आहे. 
अंकित म्हणतो,२५ फेब्रुवारी रोजी दुपारी अडीच वाजता आमच्या कॉलेज जवळच एक मोठा बॉम्बस्फोट झाला. सारेच विद्यार्थी हादरले. त्यानंतर कॉलेजच्या ८० विद्यार्थ्यांना एका बंकरमध्ये नेण्यात आलं. तिथे माझ्याशिवाय एकही भारतीय विद्यार्थी नव्हता. मारिया नावाची एक पाकिस्तानी विद्यार्थिनी मात्र या गटामध्ये होती. या बंकरमध्येही खाण्या-पिण्याशिवाय किती दिवस राहणार आणि किती दिवस आपण तग धरणार म्हणून इथून बाहेर पडण्याचा निर्णय मी घेतला. मारियाही अतिशय घाबरलेली होती. मी इथून निघतोय, हे मारियाला कळताच,‘प्लीज,मलाही तुझ्याबरोबर नेतोस का?’, अशी आर्जवी विनंती तिनं केली. मी परिस्थितीचं सारं गांभीर्य तिला समजावून सांगितलं, रस्त्यात काहीही होऊ शकतं, याचीही कल्पना तिला दिली. मग २८ फेब्रुवारी रोजी तिथून लपतछपत,गोळीबार आणि स्फोटांपासून स्वत:ला वाचवत कीव्ह येथील रेल्वे स्टेशनच्या दिशेनं पायीच आम्ही निघालो.. पाच किलोमीटरचं हे अंतर आम्हाला पन्नास किलोमीटरसारखं वाटलं. त्यात दोन दिवस माझ्या पोटात अन्नाचा कण नव्हता. चालताना पायात गोळे येत होते, चक्कर येत होती. मारियाची स्थिती तर माझ्याहून वाईट होती. शेवटी तिचं सारं सामान मी माझ्या अंगाखांद्यावर घेतलं आणि आम्ही गोळीबार, स्फोटांपासून वाचत कसंबसं एकदाचे कीव्ह रेल्वेस्टेशनवर पोहोचलो..”

पण अंकित आणि मारियाचा पुढला प्रवास सोपा नव्हता. रेल्वेस्टेशनवर लोकांचा महापूर लोटलेला. प्रवाशांनी रेल्वे खच्चून भरलेल्या होत्या. अगदी एकमेकांच्या डोक्यावर आणि अंगाखांद्यावर, जिथे कुठे साधी फट दिसेल तिथेही लोक घुसलेले होते. रेल्वेत चढायचा खूप प्रयत्न दोघांनीही केला, तीन रेल्वे सोडून द्याव्या लागल्या. शेवटी जीव पणाला लावून कसाबसा त्यांनी एका डब्यात प्रवेश केला. 
अंकित म्हणतो, केवळ दैव बलवत्तर म्हणूनच आम्ही वाचलो. रेल्वेत बसल्यानंतर तासाभरातच आम्ही ज्या डब्यात बसलो होतो, तेथून काही फुटांवर रेल्वे रुळाजवळ बॉम्बस्फोट झाला. गोळीबार सुरू झाला. खिडकीची काच फोडून एक गोळी आत आली आणि माझ्या डोक्यावरून केवळ काही सेंटिमीटर अंतरावरून गेली. केवळ नशीबानंच मी वाचलो. गोळी लागू नये म्हणून ट्रेनमधील सर्वांनीच जमेल तसं, अगदी एकमेकांच्या अंगावर झोपून घेतलं..”
एक मार्चला ते कसेबसे तेर्नोपील या युक्रेनमधीलच एका रेल्वेस्टेशनवर पोहोचले. येथे असलेल्या पाकिस्तानी दूतावासातील एका अधिकाऱ्याशी मारियाचा संपर्क झाला. त्यानंतर  पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी दोघांनाही मेडिकल युनिव्हर्सिटीच्या होस्टेलमध्ये ठेवलं. अंकितचं खूप कौतुक केलं. ही वेळ आपसी दुश्मनीची नाही, तर एकमेकांतल्या भाईचाऱ्याची असल्याचं सांगत त्यांना पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. पाकिस्तानी अधिकाऱ्यांनीच नंतर त्यांना स्वत:च्या खर्चानं एका बसमध्ये बसवून रोमानियाच्या सीमेकडे पाठवून दिलं. पण बस ड्रायव्हरनं वीस किलोमीटर आधीच त्यांना उतरवून दिलं. तिथून वीस किलोमीटर चालत दोघंही रुमानियाच्या सीमेवर पोहोचले.

‘थँक यू बेटा !..’
हा मजकूर लिहित असेपर्यंत दोघंही रोमानियातून बाहेर पडलेले नव्हते. अंकित सांगतो, इथेही हजारो लोक ताटकळत उभे आहेत. आम्ही रोमानियाच्या छावणीत प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न करीत आहोत. इथे प्रचंड थंडी आहे. तापमान शून्याच्याही बऱ्याच खाली आहे. मला ताप आहे. अंग ठणकतं आहे. अजून कोणतीच वैद्यकीय मदत आम्हाला मिळालेली नाही. स्थानिक लोक थोडीफार मदत करताहेत. मारियाच्या पालकांशी फोनवर संपर्क झाला आहे. आपल्या मुलीला वाचवत, युक्रेनमधून बाहेर काढत इथपर्यंत आणल्याचे आभार मानताना डोळ्यांत पाणी आणून ते मला म्हणाले, ‘थँक यू बेटा!..’

Web Title: Flowers of Indo-Pak friendship in the midst of war in Ukraine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.