अयोध्या : उत्तर प्रदेशातील अयोध्येमध्ये बांधलेले नवे रेल्वेस्थानक, नवे आंतरराष्ट्रीय विमानतळ, नव्या रेल्वेगाड्यांचे उद्घाटन, तसेच काही विकास प्रकल्पांचे लोकार्पण व काही विकास प्रकल्पांचे भूमिपूजन करण्यासाठी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी या शहराच्या दौऱ्यावर आले होते. अयोध्या विमानतळापासून सुरू झालेल्या मोदी यांच्या रोड शोच्या १५ किमीच्या मार्गात त्यांचे हजारो नागरिक, कलाकार, मान्यवरांनी पुष्पवृष्टी करून भव्य स्वागत केले.
त्यावेळी लोकांचा उत्साह बघून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या वाहनाचा दरवाजा उघडला व त्यांनी लोकांना हात उंचावून अभिवादन केले. त्यानंतर वाहनात उभे राहून त्यांनी जनतेला अभिवादन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शोप्रसंगी सुमारे एक लाख लोकांनी ५१ ठिकाणी त्यांचे स्वागत केले. या मार्गात १२ ठिकाणी संत-महंत, तसेच २३ संस्कृत विद्यालयांच्या १८९५ विद्यार्थ्यांनी मंत्र व शंखध्वनीद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत केले.
देधिया, बधावा नृत्ये सादर करून केले जंगी स्वागत- अयोध्या : उत्तर प्रदेशच्या कलाकारांनी केलेले देधिया नृत्य, उत्तराखंडच्या कलाकारांनी चोलिया, लखनऊ येथील नृत्यांगनांनी बधावा लोकनृत्य सादर करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अयोध्येत शनिवारी जंगी स्वागत केले.- अयोध्या विमानतळावर आगमन झाल्यानंतर तिथून त्यांनी अयोध्या धाम रेल्वे स्थानकापर्यंत रोड शो केला. त्यावेळी कलाकारांनी विविध नृत्य सादर करून मोदींचे स्वागत केले. त्यात राजस्थानातील कलाकारांनी केलेल्या चक्री नृत्याचाही समावेश होता.
निमंत्रण अद्याप नाही : मुख्यमंत्री सिद्धरामय्याकोप्पल : अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण अद्याप मला मिळालेले नाही, असे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शनिवारी सांगितले. हे निमंत्रण मिळाल्यानंतर त्याबाबत निर्णय घेईन, असे ते म्हणाले.
खटल्यातील पक्षकार इक्बाल अन्सारी यांनीही केली मोदींवर पुष्पवृष्टी- रामजन्मभूमी-बाबरी मशीद खटल्यातील एक पक्षकार इक्बाल अन्सारी यांनीदेखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शोच्या वेळी पुष्पवृष्टी करून स्वागत केले. इक्बाल अन्सारी यांनी सांगितले की, नरेंद्र मोदी हे अयोध्येत आले आहेत. ते आमचे पाहुणे तसेच देशाचे पंतप्रधान आहेत.
- अन्सारी यांच्या घराजवळून मोदी यांच्या गाड्यांचा ताफा रवाना झाला, त्यावेळी त्यांनी पुष्पवृष्टी केली. मोदींचे स्वागत करण्यासाठी अन्सारी यांचे कुटुंबीयही उपस्थित होते. त्यांचे वडील हाशिम अन्सारी हे रामजन्मभूमी-बाबरी मशीद खटल्यातील जुने पक्षकार होते. २०१६ साली हाशिम यांचे वयाच्या ९५व्या वर्षी निधन झाले. त्यानंतर इक्बाल यांनी पक्षकार म्हणून न्यायालयात उपस्थित राहण्यास सुरुवात केली.
सोहळ्यासाठी ३०० टन सुवासिक तांदूळ रवाना- रायपूर : अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी छत्तीसगडहून ३०० टन सुवासिक तांदूळ शनिवारी पाठविण्यात आला. हा तांदूळ घेऊन जाणाऱ्या ट्रकना छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साई यांनी ‘भगवा’ ध्वज दाखविला. - छत्तीसगडच्या परिसरात भगवान राम यांचे आजोळ असल्याचे तसेच १४ वर्षांच्या वनवासाच्या काळात ते येथील अनेक ठिकाणी गेले होते असे मानण्यात येते. येथील चंदखुरी हे गाव भगवान राम यांची माता कौसल्या यांचे जन्मस्थान असल्याचेही मानले जाते.
आगरतळा ते अयोध्या विशेष रेल्वेगाडी सोडावी- आगरतळा : अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला असंख्य भाविकांना जाण्याची इच्छा आहे. त्यामुळे आगरतळा ते अयोध्या या मार्गावर विशेष रेल्वेगाडी सोडावी, अशी मागणी त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा यांनी रेल्वेमंत्री अश्वनी वैष्णव यांच्याकडे केली. - साहा यांनी पत्रामध्ये म्हटले आहे की, सोहळ्यासाठी त्रिपुरातून सुमारे दोन हजार जण अयोध्येला जाणार आहेत. त्यांच्यासाठी २० जानेवारीला आगरतळा ते हून अयोध्या व २३ जानेवारीला परतण्यासाठी विशेष गाडी सोडावी.