नवी दिल्ली : वाहनांच्या हॉर्नचा कर्कश्य आवाज बदलून त्याऐवजी भारतीय संगीत वाद्यांच्या आवाजाचा उपयोग करावा, असा आदेश केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी लवकरच देण्याची शक्यता आहे. कर्कश्य हॉर्नमुळे ध्वनिप्रदूषणही मोठ्या प्रमाणावर होते. पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीनेही हॉर्नचा सूर बदलणे आवश्यक आहे. त्यासंदर्भातील अध्यादेश लवकरच जारी करण्यात येईल असे सूत्रांनी सांगितले.
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतेच सांगितले की, देशात वायू व ध्वनिप्रदूषण वाढत आहे. कित्येक लोक आपल्या गाडीला मोठ्या आवाजाचे हॉर्न लावतात. ते हॉर्न विनाकारण वाजवत असतात. त्यामुळे गाडी चालविणाऱ्यांना व रस्त्यावरून चालणाऱ्यांनाही त्याचा त्रास होतो. अशा गोष्टीमुळे अपघातही होऊ शकतात. हे सर्व लक्षात घेऊन कर्कश्य आवाजाचे हॉर्न बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घ्यायचे ठरविले आहे.
तानपुरा, तबला, पेटी, बासरी अशा वाद्यांचे समधुर सूर हॉर्नमधून कानावर पडल्यानंतर कोणाच्या कानांना फार त्रास होणार नाही, ध्वनिप्रदूषणाचे प्रमाण कमी होईल, असेही केंद्र सरकारचे मत आहे. वाहने भंगारात काढण्याच्या धोरणानंतर केंद्र सरकार पर्यावरणस्नेही वाहनांच्या वापराचा आग्रह करीत आहे. इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंगची सुविधा उपलब्ध करण्याकरिताही सरकारच्या हालचाली सुरू आहेत.
जुनी वाहने भंगारात काढण्याचा निर्णय योग्यच
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की, जुनी वाहने भंगारात काढण्याचा केंद्र सरकारचा निर्णय अतिशय योग्य आहे. जुनी वाहने ही नव्या वाहनांपेक्षा कितीतरी अधिक पट धूर वातावरणात सोडतात. त्यामुळे वायूप्रदूषणही वाढते. ज्यांची आयुष्यमर्यादा संपली आहे अशीच वाहने भंगारात काढण्याचा आदेश याआधीच केंद्र सरकारने दिला आहे.