लखनौ - शहरातील इंदिरा नगरच्या पटेल नगर परिसरात राहणारी तनुष्का सिंहने लखनौचं नाव यशाच्या शिखरावर नेले आहे. २४ वर्षीय फ्लाईंग ऑफिसर तनुष्का सिंह जग्वार फायटर जेट स्क्वॉड्रनमध्ये कायमस्वरूपी दाखल होणारी भारतीय हवाई दलाची पहिली महिला पायलट आहे. तनुष्का लवकरच ड्युटी ज्वाईन करणार आहे. सैन्य कुटुंबातून पुढे आलेली तनुष्का हिच्या या यशानंतर सर्वच स्तरातून तिचं कौतुक होत आहे. सध्या ती सैन्याच्या अंबाला एअरबेस कॅम्प इथं तैनात आहे.
तनुष्काचे आजोबा देवेंद्र बहादुर सिंह लष्करातील निवृत्त कॅप्टन तर वडील अजय प्रताप सिंह सैन्यातील निवृत्त लेफ्टिनंट कर्नल आहेत. तनुष्काच्या आजोबाने सांगितले की, लहानपणापासूनच तनुष्काचं स्वप्न सशस्त्र दलात सेवा करण्याचं होते. तामिळनाडू येथील वायूसेना केंद्रात प्रशिक्षण घेतल्यानंतर तिने हॉक एमके १३२ विमानावर १ वर्ष पायलटची ट्रेनिंग घेतली. आता तनुष्का लवकरच जग्वार स्क्वॉड्रनमध्ये सहभागी होणार आहे.
विशेष म्हणजे भारतीय हवाई दलात ट्रेनिंगवेळी अनेक महिला पायलट यांनी जग्वार उडवलं आहे परंतु कुणालाही स्क्वॉड्रनमध्ये कायमस्वरुपी सहभागी होण्याची संधी मिळाली नाही. तनुष्काच्या नियुक्तीने ती पहिली महिला पायलट बनली आहे. Jaguar हे भारतीय हवाई दलाचे सर्वात ताकदवान लढाऊ विमान आहे. जे शत्रूच्या अचूक टार्गेटवर हल्ला करण्याची क्षमता ठेवते.
कोण आहे तनुष्का सिंह?
तनुष्का सिंह हिने २०२२ मध्ये मणिपाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी येथून इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरींगमध्ये पदवीचं शिक्षण घेतले. तिचं शिक्षण मंगळुरूच्या डीपीएस एमआरपील शाळेतून झालं. लहानपणापासून तिचं स्वप्न भारतीय सैन्यात जायचं होते परंतु भारतीय हवाई दलात महिलांना मिळणाऱ्या संधीबाबत माहिती मिळाली, त्यानंतर आजोबांशी चर्चा केल्यानंतर तिने वायूसेनेत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तामिळनाडूच्या डुंडीगल येथील एअरफोर्स अॅकेडमीत एमके १३२ विमानावर तिने विशेष प्रशिक्षण घेतले. तनुष्काचे वडील लष्करात होते, तनुष्का हवाई दलात कार्यरत आहे आणि आता तनुष्काची लहान बहीण नौदलात जाण्याची तयारी करत आहे.