नवी दिल्ली, दि. 31 - सौदी अरेबियाला जाणारे भारतीय क्रू मेंबर्स सद्यस्थितीत खूप घाबरलेले आहेत. कारणंही तसंच आहे. सौदी अरेबियात भारतीय विमानानं लँडिंग केल्यानंतर क्रू मेंबर्सला ओरिजनल पासपोर्ट आणि डॉक्युमेंट्स जमा करण्यास सांगितले जाते. त्यामुळे त्यांच्याजवळ फक्त पासपोर्ट डॉक्युमेंट्सची केवळ फोटोकॉपी राहते.
खरं तर या प्रकरणामुळे भारतीय विमान कंपन्यांचे क्रू मेंबर्स सदोदित चिंतीत असतात. मात्र यावेळी हे प्रकरण जरा जास्तच गंभीर आहे. 26 जुलै रोजी जेवणासाठी काही क्रू मेंबर्स सौदी अरेबियात फिरण्यासाठी बाहेर आले, त्याच वेळी त्यांना पोलिसांनी पकडलं. तसेच त्यांच्याकडे ओरिजनल कागदपत्रांची मागणी केली. ओरिजनल कागदपत्रं नसल्यानं त्यांनी कागदपत्रांची फोटोकॉपी पोलिसांना दिली, त्यावेळी पोलिसांनी त्यांना जेलमध्ये टाकलं आणि तुमच्याकडे ओरिजनल डॉक्युमेंट्स का नाहीत, याचा जाब विचारला. तसेच त्यांना मोबाईल वापरण्यास बंदी घातली. त्याचदरम्यान एका क्रू मेंबर्सचं सर्व जण थांबलेल्या हॉटेलच्या मालकाशी बातचीत झाली आणि पोलिसांना अथक प्रयत्न करून त्यांनी समजावलं. तेव्हा पोलिसांनी त्यांना सोडून दिलं.
मात्र या सर्व प्रकारामुळे क्रू मेंबर्सला जवळपास 3 तास पोलीस कोठडीत घालवावे लागले असून, या सर्व प्रकारामुळे क्रू मेंबर्समध्ये प्रचंड भीती पसरली आहे. ओरिजनल डॉक्युमेंट्स नसल्यास पुन्हा जेलची हवा तर खायला लागणार नाही ना, हा प्रश्न त्यांना सतावतो आहे.