नवी दिल्ली :
पालकांनी सामाजिक स्थितीमुळे मुलांवर दबाव आणू नये, तसेच विद्यार्थ्यांनी अपेक्षांच्या ओझ्यातून बाहेर पडण्यासाठी आपल्या कामावर लक्ष केंद्रित करावे, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी दिला. स्टेडियमवर चौकार, षटकार मारण्याचा उद्षोघ सुरू असला, तरी फलंदाज ज्या पद्धतीने केवळ चेंडूवर लक्ष केंद्रित करतो. विद्यार्थ्यांनी अगदी तसेच केले पाहिजे, असेही ते म्हणाले.
‘परीक्षा पे चर्चा’ या वार्षिक संवादाच्या सहाव्या आवृत्तीत मोदी बोलत होते. शुक्रवारी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियममध्ये दोन तास चाललेल्या या कार्यक्रमात मोदींनी मुलांच्या परीक्षा आणि आयुष्यातील ताणतणाव या प्रश्नांना उत्तरे दिली.
कुटुंबातील निराशेला सामोर कसे जायचे?- पाटणाहून प्रियांका कुमारीने प्रश्न विचारला की, निकाल चांगले न आल्यास कुटुंबातील निराशेला सामोरे कसे जायचे? आजकाल विद्यार्थी हात कापून घेत आहेत, ते त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी इतरांवर विश्वास ठेवत नाहीत? - क्रिकेटमध्ये गुगली असते. लक्ष्य एक, दिशा दुसरी. तुम्ही मला पहिल्याच चेंडूवर मैदानाबाहेर काढू इच्छिता असे दिसते. कुटुंबीयांच्या अपेक्षा असतील, तर ते स्वाभाविक आहे. यात चुकीचे काही नाही, पण सामाजिक स्थितीमुळे कुटुंबातील सदस्य अपेक्षा करत असतील, तर ती चिंतेची बाब आहे.
दबावाखाली येऊ नका एका विद्यार्थ्याने परीक्षेतील दबावाविषयी प्रश्न विचारला. त्यावर मोदी म्हणाले, ‘दबावाखाली येऊ नका. तुम्ही कधी क्रिकेट बघायला गेला आहात का, काही फलंदाज आले की, संपूर्ण स्टेडियमवर चौकार-चौकार, षटकार-षटकारचा गजर सुरू होता, परंतु फलंदाज प्रेक्षकांच्या मागणीनुसार चौकार-षटकार मारतो का? नाहीतर त्याचे लक्ष फक्त चेंडूवर असते. तो चेंडू जसा आहे तसा खेळतो. तुम्ही तसेच केले पाहिजे....तर टीकेची पर्वा करू नकामोदी म्हणाले की, लोकशाहीत टीका शुद्धीकरणासारखी असते. टीका ही समृद्ध लोकशाहीसाठी शुद्ध यज्ञ आहे. जर तुम्ही मेहनती आणि प्रामाणिक असाल, तर तुम्ही टीकेची पर्वा करू नका कारण ती तुमची ताकद बनते, असे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. विचार करा, विश्लेषण करा, कृती करा आणि मग तुम्हाला जे हवे आहे ते साध्य करण्यासाठी तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करा, असेही ते म्हणाले. मोदींचा हा कार्यक्रम पाहण्यासाठी लाखो विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.