मुंबई : गरजा ओळखून त्याआधारे संशोधनाला प्राधान्य देण्याची गरज आहे. संशोधनातून देशात होणाऱ्या आयातीला पर्याय, किफायतशीर, प्रदूषणमुक्त, स्वदेशी उपाय पुढे यायला हवेत. याच पार्श्वभूमीवर बायो-सीएनजी, बायो-एलएनजी आणि बायो -मासपासून ग्रीन हायड्रोजनच्या (हरित इंधनाच्या) निर्मितीसाठी जैव-तंत्रज्ञानाच्या वापरावर संशोधन केंद्रित करावे, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आयआयटीच्या संशोधकांना केले.
आयआयटी, मुंबई येथील शैलेश जे. मेहता स्कूल ऑफ मॅनेजमेंटद्वारा आयोजित अलंकार-२०२२ या जागतिक नेतृत्व शिखर परिषदेत ते शनिवारी बोलत होते. यावेळी आयआयटी मुंबईचे संचालक प्रा.सुभाशीष चौधरी आणि संस्थेचे विद्यार्थी उपस्थित होते.देशात १२४ जिल्हे आहेत मात्र जिथे जास्त लोकसंख्या आहे तेथील लोक सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या आजही मागासलेले आहेत. यामुळे या जिल्ह्यांमधील वन-आधारित उद्योग, कृषी आणि ग्रामीण तंत्रज्ञान, आदिवासी क्षेत्र यांना संशोधकानी आपल्या संशोधनात प्राधान्य द्यायला हवे असे आवाहन गडकरी यांनी केले. यामुळे तेथील स्थानिक विकास मोठया होईल आणि रोजगाराच्या संधी निर्माण होतील असे तयांनी यावेळी अधोरेखित केले.
भविष्यात ग्रीन हायड्रोजनचा (हरित इंधनाचा) वापर रसायने, खते, पोलाद सारख्या विविध उद्योगांमध्ये तसेच वाहतूक क्षेत्रातही होणार आहे. त्यामुळे देशातील तरुण, प्रतिभावान अभियांत्रिकी मनुष्यबळाला इलेक्ट्रोलायझिंगद्वारे सांडपाण्यावर प्रक्रिया करून ग्रीन हायड्रोजन निर्मितीवर संशोधन करण्याचे आवाहन गडकरी यांनी यावेळी केले. यामुळे नगरपालिकांना कचऱ्यातून संपत्ती निर्मिती बरोबरच स्वच्छ भारत अभियान राबविण्यास देखील मदत होईल असे केंद्री मंत्र्यांनी अखेरीस स्पष्ट केले.
इलेक्ट्रिक वाहनांना पसंती
आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी वाहतूक क्षेत्रासाठी नवीन तंत्रज्ञानावर त्यांचे संशोधन लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन यावेळी गडकरी यांनी केले. देशात १० लाख इलेक्ट्रिक बसेस चालवण्याची क्षमता असून त्यामध्ये डबल डेकर, एसी आणि लक्झरी बसचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले तसेच ४०० स्टार्ट अप ‘ इलेक्ट्रिक’ वाहनांसाठी काम करत आहेत, अशी माहितीही गडकरी यांनी दिली.
प्रदूषण चिंतेची बाब
देशाच्या ऊर्जा निर्मितीत सौरऊर्जेचा ३८ टक्के वाटा आहे मात्र भविष्यात ऊर्जा संकट वाढणार असल्याचे सांगत पर्यावरण आणि परिसंस्थेसाठी प्रदूषण ही एक मोठी चिंतेची बाब असल्याचे त्यांनी कार्यक्रमात अधोरेखित केले. आपला देश १६ लाख कोटी रुपयांचे जीवाश्म इंधन आयात करत असल्याकडे लक्ष वेधत भविष्यात आपण ऊर्जा आयातदार कसे होणार याकडे लक्ष द्यायला हवे असे गडकरीनी आयआयटी विद्यार्थ्यांना आवाहन केले आहे.