- सुरेश भटेवरा, नवी दिल्ली
देशात गायींना वाचवण्यासाठी सरकारने सर्व प्रकारचे प्रयत्न चालवले आहेत. मात्र, महिलांवर होणाऱ्या अत्याचाराबाबत सरकार गप्प आहे. देशात महिला असुरक्षित वातावरणात जगत आहेत. प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदावर असलेल्या महिलेच्या विरोधात भाजपचा एक नेता इतक्या घृणास्पद भाषेत कसे बोलू शकतो? असा सवाल जया बच्चन यांनी राज्यसभेत उपस्थित केला. अलीगड येथील भारतीय जनता युवा मोर्चाचा नेता योगेश वार्ष्णेयने प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचे मस्तक धडावेगळे करणाऱ्यास ११ लाख रुपयांचा पुरस्कार घोषित केला. बंगालच्या वीरभूम जिल्ह्यात हनुमान जयंतीच्या मिरवणुकीवर लाठीचार्ज झाल्यामुळे संतप्त झाल्यामुळे हा प्रकार योगेशने केल्याची चर्चा आहे. तेव्हा गप्प का होते?जया बच्चन यांचा प्रतिवाद करताना सत्ताधारी सदस्या रूपा गांगुली म्हणाल्या की, बंगालमधे पोलिसांच्या उपस्थितीत १७ समाजकंटकांनी मला मारहाण केली. राज्याच्या मुख्यमंत्री महिला आहेत, तशी मीदेखील एक महिलाच आहे. सभागृहात या घटनेची कोणीही दखल का घेतली नाही. त्याचे उत्तरही मला हवे आहे.