ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि.10- भारताचा अवकाशातील सहावा डोळा म्हणून ओळख असणाऱ्या कार्टोसॅट 2 या उपग्रहाने पृथ्वीची छायाचित्रे पाठवण्यास सुरुवात केली आहे. 22 जून रोजी कार्टोसॅटचे भारताने यशस्वी प्रक्षेपण केले होते. आता कार्टोसॅटने पृथ्वीच्या विविध भूभागांची छायाचित्रे पाठवली आहेत. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायजेशन (इस्रो) ने ही छायाचित्रे संकेतस्थळावर आणि ट्वीटरवर प्रसिद्ध केली आहेत.
सुरुवातीच्या काही छायाचित्रांमध्ये राजस्थानमधील किशनगढ येथील रेल्वे स्थानक, इजिप्तमधील अलेक्झांड्रीया आणि कतारमधील दोहा येथिल छायाचित्रांचा समावेश आहे. कार्टोसॅट - 2 मालिकेतील हा सहावा उपग्रह आहे. त्याचे वजन 712 किलो आहे. अन्य 30 नॅनो उपग्रहांचे मिळून एकत्रित वजन 243 किलो आहे. कार्टोसॅट - 2 मालिकेतील सहाव्या उपग्रहामुळे भारतीय संरक्षण दलांना मोठी मदत मिळाली आहे. तसेच या उपग्रहामुळे आता दहशतवाद्यांचे तळ, बंकर याची खडानखडा माहिती मिळेल. कार्टोसॅट मालिकेतील उपग्रहांना भारताचे आकाशातील नेत्र म्हटले जाते. सप्टेंबर महिन्यात सर्जिकल स्ट्राईक करताना या उपग्रहांची मदत घेण्यात आली होती. उच्च क्षमतेची छायाचित्रे, डाटा मिळवण्यासाठी कार्टोसॅट मालिकेतील सहाव्या उपग्रहाची आवश्यकता होती. भारताला ठराविक डाटासाठी दुस-यांवर अवलंबून रहावे लागत होते. त्यासाठी सहावा उपग्रह आवश्यक होता. कार्टोसॅट मालिकेतील उपग्रह अशा पद्धतीने बनवण्यात आले आहेत की, महत्वाच्या प्रसंगी एखाद्या ठराविक भागाचे छायाचित्र तुम्हाला मिळू शकते. या प्रसिद्ध झालेल्या छायाचित्रांमुळे आता हा उद्देश पूर्ण होत असल्याचे दिसून येते.
उरीच्या लष्करी तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय लष्कराने मागच्यावर्षी सप्टेंबर महिन्यात पाकव्याप्त काश्मीरघुसून सर्जिकल स्ट्राईक केले होते. पाकिस्तानी दहशतवाद्यांचे तळ उद्धवस्त करण्याच्या या ऑपरेशनमध्ये लष्कराने कार्टोसॅट कुटुंबातील उपग्रहांची मदत घेतली होती. कार्टोसॅटने पाठवलेल्या उच्च क्षमतेच्या छायाचित्रांमुळे लष्कराला आपले टार्गेटस निवडण्यात मदत झाली होती.