नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये पक्षाचे नाव, चिन्हाबाबत उल्लेख करताना, आम्ही दिलेल्या निर्देशाचे पालन करावे, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी शरद पवार गट आणि अजित पवार गटाला दिले.
न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्या. के. व्ही. विश्वनाथन यांच्या पीठाने १९ मार्च रोजी पक्षाच्या नाव व चिन्ह वापरासंदर्भात दिशानिर्देश दिले होते. या निर्देशांचे पालन होत नसल्याच्या दोन्ही गटांच्या याचिकांवर गुरुवारी सुनावणी पार पडली. शरद पवार गटाने आगामी लोकसभा निवडणूक व चार राज्यांतील विधानसभा निवडणूक प्रचारात ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार’ हे नाव आणि ‘तुतारी’ हे चिन्ह वापरावे व त्यासंदर्भात पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सूचित करावे.
तसेच अजित पवार गटाला निवडणूक आयोगाकडून मिळालेले ‘घड्याळ’ हे चिन्ह ‘न्यायप्रविष्ट’ असल्याचा उल्लेख इंग्रजी, हिंदी व मराठी दैनिकांमध्ये नोटीस जारी करून तसेच प्रचारादरम्यान फलकांवरही उल्लेख करण्याचे आदेश दिले. तसेच १९ मार्च रोजी यासंदर्भात दिलेल्या आदेशांमध्ये फेरबदल करण्याची मागणी फेटाळून लावली.
‘न्यायप्रविष्ट’ जाहिरात प्रसिद्ध करण्याची ग्वाही- सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करताना लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे ‘घड्याळ’ चिन्ह ‘न्यायप्रविष्ट’ असल्याच्या जाहिराती वृत्तपत्रांमध्ये ठळकपणे प्रसिद्ध करण्यात येतील. - पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली होणार नाही याचीही काळजी घेतली जाईल, अशी ग्वाही आज अजित पवार गटाच्या वतीने देण्यात आली.