नवी दिल्ली : ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी जवाहरलाल दर्डा यांनी धर्म, पक्ष, व्यक्ती सर्वांचा आदर आणि प्रतिष्ठा राखली. आज त्यांचे अनुकरण करून मानवतेला एकत्र ठेवण्याची गरज आहे. त्यासाठी सिद्धान्त, धोरण आणि कार्यक्रमाच्या आधारावर लढाई व्हायला हवी, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री गुलाम नबी आझाद यांनी ‘जवाहर’ चरित्रग्रंथाच्या हिंदी आवृत्ती प्रकाशनप्रसंगी केले.
स्वर्गीय जवाहरलाल दर्डा यांचा व्यक्तिगत स्नेह लाभलेल्या आणि त्यांच्या राजकीय जीवनातली सस्मित सकारात्मकता अनुभवलेल्या मान्यवरांनी त्यांच्या संपन्न जीवनाला सलाम करताना बदललेल्या राजकारण-समाजकारणाचे अस्वस्थ करणारे रंग उलगडले आणि अवघी संध्याकाळ श्रोत्यांना अंतर्मुख करून गेली.
दिल्लीच्या रफी मार्गावरील कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडियाच्या स्पीकर हॉलमध्ये सोमवारी सायंकाळी ४ वाजता पार पडलेल्या या सोहळ्याला विविध राजकीय पक्षांचे खासदार, माजी खासदार तसेच दिल्लीतील अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक लोकमत मीडिया समूहाचे चेअरमन डॉ. विजय दर्डा यांनी केले, तर आभार लोकमत मीडिया समूहाचे एडिटर-इन-चीफ राजेंद्र दर्डा यांनी मानले. सूत्रसंचालन श्वेता सेलगावकर यांनी केले.
‘मुलांपेक्षा जास्त वेळ मी बाबूजींसोबत असायचो...’बाबूजींच्या आठवणींना उजाळा देताना गुलाम नबी आझाद म्हणाले, महाराष्ट्र सरकारमध्ये बाबूजींनी अनेक महत्त्वाची खाती सांभाळली आणि प्रत्येक खात्यावर आपली छाप सोडली. १९७९ साली इंदिरा गांधींनी आपण विदर्भातून लोकसभेची निवडणूक लढवावी, असा निर्णय घेतला. त्यावेळी आपल्या वाशीम लोकसभा मतदारसंघातील चार विधानसभा मतदारसंघ अकोला जिल्ह्यातील तर दोन यवतमाळ जिल्ह्यातील होते. गुलाम नबी वाशीममधून निवडणूक लढतील. त्यांच्यासाठी गाडी, त्यांचा सारा बंदोबस्त, प्रचाराची जबाबदारी, लोक पाठवतील आणि त्यांचा उमेदवारी अर्ज भरण्याची व्यवस्था करण्यासाठी जवाहरलाल दर्डा यांना सांगा, असे राष्ट्रीय सरचिटणीस अंतुले यांना सांगितले. बाबूजींच्या मुलांपेक्षा जास्त वेळ आपण त्यांच्यासोबत भोजन आणि बैठकी करायचो, असा त्यांनी आवर्जून उल्लेख केला.