रांची - नेतृत्वात बदल केल्यानंतरही पंजाब काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या वादविवादांमुळे पक्षामध्ये आधीच चिंतेचे वातावरण आहे. त्या आता अजून एका राज्यातील घडामोडींमुळे काँग्रेस हायकमांडचे टेन्शन वाढण्याची शक्यता आहे. पंजाबपाठोपाठ आता छत्तीसगडमध्ये राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. राज्यातील काँग्रेसचे अकरा आमदार आज अचानक दिल्लीकडे रवाना झाले. हे आमदार दिल्लीमध्ये हायकमांडचीही भेट घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. (Following Punjab, now there is a big development in Chhattisgarh Congress, seven MLAs left for Delhi)
या आमदारांच्या दिल्ली दौऱ्यामुळे राजकारण तापले आहे. मात्र काँग्रेसचे वरिष्ठ नेते याबाबत काहीही बोलणे टाळत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे समर्थक असलेले हे आमदार वेगवेगळ्या विमानांमधून दिल्लीसाठी रवाना झाले आहेत. ते दिल्लीमधून शिमला येथे जाणार आहेत. तसेच तिथे एकत्र सुट्टी घालवतील, असे सांगण्यात येत आहे. सुरुवातीला सात आमदार दिल्लीला गेल्याचे वृत्त आले होते. मात्र नंतर यामध्ये चार अजून अमदारांच्या नावांचा समावेश झाला. मात्र या मुद्द्यावरून आता काँग्रेसमध्ये राजकीय चर्चेलाही उधाण आले आहे.
दिल्लीकडे रवाना झालेल्या काँग्रेस आमदारांपैकी केवळ सर यू.डी. मिंज, राजकुमार यादव आणि विकास उपाध्याय यांची नावेच समोर आली आहेत. छत्तीसगडमधील अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्र्यांचा फॉर्म्युल्यावरून उठलेले राजकीय वादळ शांत झाले असे वाटत असतानाच आमदारांच्या दिल्ली दौऱ्यामुळे पुन्हा एकदा तर्कवितर्कांना उधाण आले आहे.