Loudspeakers UP Government Guidelines : उत्तर प्रदेशातील मथुरा येथे असलेल्या श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिर परिसरात लावण्यात आलेले लाऊडस्पीकर्स आता बंद करण्यात आले आहे. श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिर ट्रस्टनं यासंदर्भातील निर्णय घेतला आहे. लाऊडस्पीकर्स संदर्भात योगी आदित्यनाथ सरकारनंही काही नव्या गाईडलाईन्स जारी केल्या होत्या, त्याचंच पालन करत हा निर्णय घेण्यात आला आहे. श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिराच्या घुमटावर लावण्यात आलेले लाऊडस्पीकर्स बुधवारपासून बंद करण्यात आल्याची माहिती श्रीकृष्ण जन्मभूमी ट्रस्ट आणि श्रीकृष्ण जन्मस्थान सेवा संस्थानाचे सचिव कपिल शर्मा यांनी दिली.
मंदिर परिसरात लावण्यात आलेल्या लाऊडस्पीकरवर मंगला आरतीपासून रात्रीची शयन आरती, विष्णु सहस्त्रनाम ऐकवलं जात होतं. त्याचा आवाज मंदिर परिसराच्या बाहेरही ऐकू येत होता. परंतु आता लाऊडस्पीकर्स बंद करण्यात आले आहेत. तसंच मंदिर परिसरातील भजनांचा आवाजही बाहेर जाऊ नये म्हणून तो कमी करण्यात आला आहे. योगी आदित्यनाथ यांच्या आवाहनानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचं शर्मा यांनी स्पष्ट केलं.
नवी नियमावली जारीमाइक, साऊंड सिस्टमचा वापर केला जावा परंतु याचा आवाज धार्मिक परिसराच्या बाहेर जाणार नाही याची काळजी घ्यावी
आवाजाचा कुठलाही त्रास अन्य लोकांना होता कामा नये.
नवीन स्थळांवर लाऊडस्पीकर लावण्यासाठी परवानगी घ्यावी.
कुठल्याही परवानगीशिवाय शोभायात्रा किंवा जुलूस काढू नये, परवानगी देण्यापूर्वी शांतता आणि सलोखा राखला जाईल यासाठी प्रतिज्ञापत्र सादर करावं लागेल.
जे पारंपारिक सण, उत्सव आहेत किंवा धार्मिक यात्रा आहेत तेव्हाच परवानगी दिली जाईल. अनावश्यक कारणासाठी परवानगी दिली जाणार नाही.
मुस्लीम धर्मगुरूंनीही योगी सरकारच्या निर्णयाचं स्वागत केले आहे. रामनवमी आणि हनुमान जयंती यावेळी घडलेल्या हिंसाचारानंतर योगी सरकारनं आगामी उत्सावात कुठलीही अनुचित प्रकार घडू नये यासाठी काळजी घेत आहे. कायदा सुव्यवस्था पाळण्यासाठी योगी सरकारनं व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा बैठक घेतली. त्यावेळी या नियमावलीचे पालन करण्याचे आदेश दिले आहेत.