लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : इस्रायल-हमास यांच्यातील युद्धाला मंगळवारी २५ दिवस पूर्ण झाले. आतापर्यंत १० हजारहून अधिक जण यात मारले गेले. आंतरराष्ट्रीय संघटनांनी युद्ध मिटावे यासाठी केलेले प्रयत्न निष्फळ ठरले. या पार्श्वभूमीवर जागतिक बँकेने युद्ध असेच सुरू राहिल्यास त्याचे परिणाम संपूर्ण जगाला भोगावे लागतील. तेलच नव्हे खाण्या-पिणेही महागेल असा इशारा दिला आहे. जागतिक बँकेच्या कमोडीटी मार्केट आऊटलुकमध्ये ही बाब समोर आली आहे.
यामुळे जागतिक स्तरावर खनिजतेलाच्या पुरवठा साखळीला फटका बसून जगभर तेलाचे भाव भडकू शकतात. यामुळे खाण्यापिण्याच्या वस्तू महाग होऊ शकतात, असे म्हटले आहे.
हे युद्ध दीर्घ काळ चालल्यास जागतिक अर्थव्यवस्थेत पहिल्यांदाच विजेचे दुहेरी संकट निर्माण होईल. - इंदरमित गिल, मुख्य अर्थतज्ज्ञ, जागतिक बँक
युद्धामुळे खनिजतेल महागल्याने जगभरात खाद्यपदार्थही महागणार आहेत. खाद्य महागाई दर वाढल्याने विकसनशील देश सध्या अनेक अडचणींचा सामना करीत आहेत. युद्धामुळे या देशांसमोरील अडचणींमध्ते णखी भर पडू शकते.- अहान कोसे, उपमुख्य अर्थतज्ज्ञ, जागतिक बँक
लघु व्यत्यय : युद्ध फार काळ न भडकल्यास याचा फटकाही मर्यादित बसेल. आंतरराष्ट्रीय पातळीवर तेलाच्या किमती ८१ डॉलर्स प्रति बॅरलपर्यंत खाली येऊ शकतात.
मध्य व्यत्यय : इस्रायल-हमास युद्धाची व्याप्ती वाढल्यास युद्धामुळे व्यापाराला मध्यम स्वरूपाचा फटका बसू शकतो. या स्थितीत जागतिक स्तरावर तेलाच्या पुरवठ्यात दररोज ३ ते ५ दशलक्ष बॅरलपर्यंत घट होऊ शकते. यामुळे जगभरात तेलाच्या किमती ३५ टक्क्यांनी वाढू शकतात.
मोठा व्यत्यय : युद्ध दीर्घ काळ चालल्यास स्थिती गंभीर होऊ शकते. जागतिक स्तरावर तेल पुरवठ्याला प्रतिदिन ६ ते ८ दशलक्ष बॅरलची घट होऊ शकते. त्यामुळे तेलाच्या किमती ५६ ते ७५ टक्क्यांनी वाढून १४० ते १५७ डॉलर बॅरलपर्यंत भडकू शकतात.