ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 21 - भारतीय रेल्वे कॅटरिंग सर्व्हिसची सीएजीच्या रिपोर्टमुळे पोलखोल झाली आहे. सीएजी ऑडिट रिपोर्ट आज संसदेत ठेवण्यात येणार आहे. रिपोर्टनुसार, रेल्वे स्टेशनांवर खाण्या-पिण्याचे जे पदार्थ बनवण्यात येतात, ते खाण्यायोग्य नाहीत. ट्रेन आणि स्टेशनांवर बनवण्यात येणारे खाद्यपदार्थ हे प्रदूषित असतात. पॅकबंद खाद्यपदार्थ आणि बाटलीबंद पाणी नियतकालीन वेळेनंतर विकण्यात येत असल्याचं धक्कादायक वास्तव रिपोर्टमधून समोर आलं आहे. तसेच अनधिकृत कंपन्यांच्या पाण्याच्या बोटलही विकल्या जात आहेत. रेल्वे परिसर आणि ट्रेनमध्ये अजिबात साफसफाई नसते. ट्रेनमध्ये विकण्यात येणा-या अन्न पदार्थांचं बिल दिलं जात नाही. अन्नपदार्थांच्या दर्जाबाबतही प्रवाशांच्या अनेक तक्रारी आहेत. सीएजी आणि रेल्वेच्या संयुक्त टीमनं 74 स्टेशन्स आणि 80 ट्रेनची पाहणी केली आहे. या पाहणीदरम्यान ट्रेन आणि स्टेशनांवर साफसफाईची बोंबाबोंब असल्याचं निदर्शनास आलं आहे. रिपोर्टनुसार, पाण्याच्या बोटल सरळ सरळ नळातील अशुद्ध पाण्यानं भरण्यात येतात आणि त्यानंतर त्या पॅकिंग केल्या जातात. अनेक स्टेशनांवर कच-याच्या डब्यांवर झाकणंच नसून, त्यांची साफसफाई केली जात नसल्याचं समोर आलं आहे. खाद्यपदार्थांना माश्या, किडे आणि धुळीपासून वाचवण्यासाठी झाकून ठेवलं जात नाही. त्याप्रमाणेच ट्रेनमध्ये झुरळं आणि उंदीरही आढळले आहेत. ट्रेनमध्ये वेटर आणि कॅटरिंग मॅनेजरकडे विकण्यात येणा-या खाद्यपदार्थांचं कोणतंही मेनूकार्ड नसणे. खाण्याचे पदार्थ ठरलेल्या प्रमाणापेक्षा कमी देणे यांसारख्या गोष्टी रिपोर्टमधून समोर आल्या आहेत. ऑडिट रिपोर्टमधून रेल्वेच्या वारंवार बदलणा-या कॅटरिंग पॉलिसीवरही सवाल उपस्थित करण्यात आला आहे.
मोदींच्या स्वच्छ भारत मिशनला रेल्वेनं हरताळ फासला आहे. भारतीय रेल्वे जगातील सर्वोत्तम रेल्वे बनविण्यासाठी भरघोस आर्थिक तरतुदीद्वारे पायाभूत सुविधा उभारण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचंही रेल्वेमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं. रेल्वे अर्थसंकल्प येत्या काही वर्षांत 2 लाख 75 हजार कोटी रुपयांपर्यंत वाढवून त्यानंतर रेल्वे क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी आर्थिक तरतूद 8 लाख 70 हजार कोटी रुपयांपर्यत वाढविण्यात येईल. या सर्वांमुळे येत्या पाच वर्षांत रेल्वेचा पूर्णपणे कायापालट झालेला दिसेल, असे सूतोवाच केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केले होते. गेल्या काही दिवसांपूर्वी मध्य रेल्वेच्या प्रवाशांनीही चांगली सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली होती. सँडहर्स्ट रोड, भायखळा, चिंचपोकळी या स्थानकाची प्रवासी सुविधा समितीकडून पाहणी करण्यात आली. मध्य रेल्वेवरील प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेत, रेल्वे स्थानकांवर प्रवाशांसाठी शौचालय, पंखे अशा अनेक सुविधा देण्याचे काम युद्धपातळीवर करा, असे निर्देश रेल्वे प्रशासनाला प्रवासी सुविधा समितीचे सदस्य नागेश नामजोशी आणि मोहम्मद इरफान अहमद यांनी दिले होते.