ऑनलाइन लोकमत
पल्लीपुरम, दि. 2 - केरळमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) 400 जवानांना अन्नातून विषबाधा झाली आहे. थिरुवनंतपुरमच्या पल्लीपुरम येथील केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या तळावर शनिवारी रात्री जेवण केल्यानंतर जवानांची प्रकृती बिघडली. त्यानंतर जवानांना विविध रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
गंभीर प्रकृती असलेल्या 109 जवानांना त्रिवेंद्रम मेडिकल कॉलेजच्या रूग्णालयात निगराणीखाली ठेवण्यात आलं आहे. जवानांनी मासे खाल्ल्यानंतर त्यांची प्रकृती बिघडल्याचं सांगितलं जात आहे. त्यानंतर जवानांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं. रविवार सकाळपर्यंत 130 जवानांना रूग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तरी 30 ते 35 जवानांची प्रखृती अजूनही खराब आहे. या सर्व जवानांची सीआरपीएफमध्ये नव्याने भरती झाली होती. जास्त उष्णतेमुळे विषबाधा झाल्याची शक्यता सीआरपीएफच्या सुत्रांकडून व्यक्त करण्यात येत आहे. राज्याच्या आरोग्य मंत्री के.के. शैलजा यांनी रूग्णालयात जाऊन जवानांची भेट घेऊन विचारपूस केली आहे.
यापुर्वी मार्च महिन्यात राजस्थानच्या बाडमेरच्या गढरा परिसरातही तीन डझनपेक्षा जास्त जवानांना विषबाधा झाली होती.