नवी दिल्ली - एका रुग्णाच्या पोटातून चक्क फुटबॉलच्या आकाराचा ट्यूमर काढण्यात आला आहे. दिल्लीमधील गंगाराम रुग्णालयात ही शस्त्रक्रिया करण्यात आली. इतका मोठा ट्यूमर पाहून डॉक्टरांनाही आश्चर्याचा धक्का बसला. पोटामध्ये असणा-या या ट्यमुरला बाहेर काढण्यासाठी डॉक्टरांना अथक प्रयत्न करावे लागले. डॉक्टरांनी मोठ्या जिकीरने सात तासांच्या सर्जरीनंतर ट्यूमर बाहेर काढला.
रुग्णाच्या पोटात ट्यूमरच्या नसांचं जाळं पसरलं होतं. रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी दोन ट्यूमर एकत्र काढण्याचं आव्हान डॉक्टरांसमोर होतं. रेक्टमजवळही नसांचं जाळ पसरलं होतं. प्रत्येक नस कापावी लागणार असल्या कारणाने अत्यंत काळजीपूर्वक शस्त्रक्रिया करावी लागणार होती. सात तासांच्या मॅरेथॉन सर्जरीनंतर दिल्लीमधील डॉक्टरांनी रुग्णाच्या पोटातून फुटबॉलच्या आकाराचे दोन ट्यूमर बाहेर काढले. इतका मोठा ट्यूमर पहिल्यांदाच काढला गेल्याचा दावा डॉक्टरांनी केला आहे.
तंजानियाच्या 32 वर्षीय ओमार सलीम यांनी जेव्हा आपल्या पोटात ट्यूमर असल्याचं कळलं तेव्हा त्यांनी सर्जरी करण्यासाठी रुग्णालयांमध्ये धाव घेण्यास सुरुवात केली. तेथील डॉक्टरांनी सर्जरी करण्यास सुरुवात केली. मात्र पोटात दोन ट्यूमर असल्याचं कळल्यानंतर त्यांनी टाके मारुन त्यांना घरी पाठवलं. यानंतर सलीम दिल्लीला पोहोचले. दिल्लीमधील अनेक रुग्णालयात ते गेले, मात्र कोणीही सर्जरी करण्याची तयारी दाखवली नाही. अखेर गंगाराम रुग्णालयाने त्यांना दाखल करुन घेतलं. तीन महिने औषधोपचार केल्यानंतर त्यांच्या पोटातून ट्यूमर काढण्यात आला.