नवी दिल्ली : क्राऊडस्ट्राइक ही एक ऑनलाइन सायबर सुरक्षा देणारी कंपनी आहे. कंपनीने रिलीज केलेल्या अपडेटमुळे संगणक क्रॅश झाले. क्राऊडस्ट्राइकचे फाल्कन सेन्सर हे टूल ऑनलाइन हल्ला राेखण्यासाठी वापरले जाते. मात्र, त्यातच बिघाड झाला. याचा परिणाम वैयक्तिकरीत्या वापर हाेणाऱ्या संगणकांसाेबतच सर्व्हरवर अवलंबून असलेल्या अनेक व्यावसायिक ॲप्लिकेशन्सवर झाला. ही ॲप्लिकेशन्स बंद पडल्यामुळे त्यावर अवलंबून असलेली विमानसेवा, रुग्णालये, बँकिंग, शेअर बाजार इत्यादी सेवांवर परिणाम झाला.
अचानक लाखाे संगणक बंद पडले. त्यामुळे मायक्राेसाॅफ्टच्या डेटा सेंटर आणि नेटवर्क यंत्रणेवर ताण आल्याने मायक्राेसाॅफ्टची सेवा विस्कळीत झाली. अख्ख्या जगाची यंत्रणा चालविणाऱ्या यंत्रणा बाेटावर माेजण्याएवढ्या कंपन्यांवर अवलंबून असल्याचे या घटनेतून दिसले.
भारतातील २००पेक्षा जास्त विमाने रद्द
मायक्राेसाॅफ्टच्या तांत्रिक समस्येमुळे देशभरातील विविध विमान कंपन्यांनी २००पेक्षा जास्त उड्डाणे रद्द केली. इंडिगाेने १९२ उड्डाणे रद्द केल्याची माहिती दिली. जगभरातील विमान वाहतुकीला फटका बसला आहे, जाे आमच्या नियंत्रणात नाही. त्यामुळे उड्डाणे रद्द केली आहेत, असे विमान कंपन्यांनी सांगितले.
सर्व्हर्स बंद असल्यामुळे कंपन्यांना तिकिटांचे फेरबुकिंग, रिफंड इत्यादी करता येत नव्हते. त्यामुळे ज्यांची उड्डाणे रद्द झाली, त्यांना पैसेदेखील मिळाले नाहीत. मुंबई येथून ५०, पुणे २५, औरंगाबाद १, कोल्हापूर येथून १ तर नागपूर येथून ४ विमाने रद्द झाली.
प्रवाशांच्या असंख्य तक्रारी, उत्तर काेणाकडेच नाही
nविमान कंपन्यांनी अचानक काही उड्डाणे रद्द केली. त्यामुळे या उड्डाणांवर अवलंबून असलेल्या प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. देव माेहंती नावाच्या प्रवाशाने साेशल मीडियावर लिहिले की, मी चेन्नई विमानतळावर अडकलाे आहे. माझे गाेव्यासाठी तिकीट हाेते. पण, विमान रद्द झाल्याचे येथे आल्यावर कळले. काेणतीही सूचना देण्यात आली नाही. पर्यायी व्यवस्था काय? याबाबत काेणतीही माहिती नाही.
nसंकेन नावाच्या प्रवाशाने लिहिले की, माझे सायंकाळी ५ वाजताचे विमान हाेते. ते रद्द झाल्याबाबत काेणतीही माहिती देण्यात आली नाही. नागपूर येथे अमेरिकेत जाण्यासाठी माझे तिकीट आहे. त्याबद्दलही काहीच माहिती नाही. काेणाशी संपर्क करत येत नाही. आम्ही काय करावे, हेदेखील काेणी नीट सांगत नाही. माझे अमेरिकेचे विमान हुकणार आहे.
‘मायक्राेसाॅफ्ट’ का महत्त्वाचे?
nमायक्राेसाॅफ्ट अझ्युअर आणि डायनामिक्स ३६५ या याचा वापर एअरपाेर्ट मॅनेजमेंट सिस्टिममध्ये हाेताे. प्रवाशांची माहिती, बॅगेज हँडलिंग तसेच व्यवस्थापन इत्यादींसाठी हे साॅफ्टवेअर वापरण्यात येतात.
nविमानात बसलेल्या प्रवाशांना त्यांच्या माेबाइल किंवा संगणकांवर विविध प्रकारची माहिती, तसेच मनाेरंजनात्मक कंटेट पुरविला जाताे.
nविमानातील चालक दलाकडे असलेल्या टॅबलेटमध्ये विविध ॲप्स असतात. त्यात प्रवाशांची माहिती, तसेच पुरविण्यात येणाऱ्या सेवांची अद्ययावत माहिती ठेवण्यात येते.
अमेरिका, युराेप, भारत, ऑस्ट्रेलियासह अनेक देशांमध्ये विमानांची उड्डाणे राेखण्यात आली. काही उड्डाणे रद्द करण्यात आली.
ब्रिटनमध्ये रेल्वे सेवेवर परिणाम झाला. काही गाड्या रद्द करण्यात आल्या. तिकीट विक्री थांबविण्यात आली.
लंडन स्टाॅक एक्स्चेंजमधील सेवा ठप्प पडली.
स्काय न्यूज ही वृत्तवाहिनी बंद पडली.
अमेरिकेतील ९११ व इतर आपत्कालीन सेवा देणारे काॅल सेंटरमधील काम बंद पडले.
विमानतळांवर विमानांच्या उड्डाणांसंदर्भात काेणतीही माहिती डिस्प्ले करण्यात येत नव्हती. त्यामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड गाेंधळ निर्माण झाला.
दिल्ली विमानतळावर उड्डाणांची माहिती नाेटीस बाेर्डावर हाताने लिहिण्याची वेळ आली.
पॅरिस ऑलिम्पिक आयाेजकांनाही फटका
पॅरिसमध्ये आठवडाभराने ऑलिम्पिक स्पर्धा सुरू हाेणार आहे. या स्पर्धेच्या आयाेजकांनाही मायक्राेसाॅफ्ट आउटेजचा फटका बसला आहे. स्पर्धेसाठी अधिस्वीकृतीची प्रक्रिया विस्कळीत झाली आहे. तसेच काही जणांना उद्घाटन साेहळ्यासाठी लागणारे पासेस घेण्यात अडचणी येत आहेत.
मंत्रीही ताटकळले
मायक्रोसॉफ्ट सर्व्हरमधील तांत्रिक बिघाडाचा फटका मंत्र्यांनाही बसला. लखनौच्या अमौसी विमानतळावर केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांचे विमान यामुळे सुमारे २ तास अडकून पडले होते. शिवराज सिंह यांचे इंडिगो विमान लखनौहून दिल्लीला दुपारी १:३५ वाजता उड्डाण करणार होते. मात्र, ते सतत शेड्यूल करत ३:२० मिनिटांनी या विमानाने उड्डाण केले. विमान उड्डाणाला विलंब झाल्याने विमानतळावर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.
काय आहे ‘ब्ल्यू स्क्रीन ऑफ डेथ’?
मायक्राेसाॅफ्टची ऑपरेटिंग सिस्टिम असलेल्या संगणकांची स्क्रीन अचानक निळ्या रंगाची झाली. अशी स्क्रीन म्हणजे ब्ल्यू स्क्रीन ऑफ डेथ म्हटले जाते. संगणकाच्या क्रिटिकल एररची माहिती त्यात देण्यात येते.
अशी स्क्रीन दिसणे म्हणजे तुमचा संगणक क्रॅश झाला आहे. या एररमुळे संगणक रिस्टार्ट हाेताे. जी माहिती सेव्ह केलेली नाही, ती गमाविण्याचा धाेका असताे. आजच्या आउटेजमध्ये अनेकांचे संगणक रिस्टार्ट झालेच नाहीत. त्यामुळे जगभरातील सेवांवर परिणाम झाला.
क्राऊडस्ट्राइकने सांगितला हा ताेडगा
ज्या क्राऊडस्ट्राइकच्या अपडेटमुळे जगभरातील संगणक बंद पडले, त्या कंपनीने या समस्येवर ताेडगा सांगितला.
nविंडाेज सिस्टिमला सेफ माेडवर बूट करा.
nC:/Windowsystem32/drivers/CrowdStrike या फाेल्डरमध्ये जावे.
n“C-00000291*.sys” ही फाईल शाेधा आणि डिलिट करा.
nत्यानंतर संगणक सामान्यपणे बूट करा.