पीलीभीत : गेल्या तीन दशकांपासून उत्तर प्रदेशातील पीलीभीत लाेकसभा मतदारसंघावर वर्चस्व राखणारे मेनका गांधी आणि वरुण गांधी हे यंदा या जागेच्या रणधुमाळीत दिसणार नाहीत. भाजपने वरुण यांचे तिकीट कापून जितीन प्रसाद यांना उमेदवारी दिली आहे. ही जागा जिंकण्यासाठी आता भाजपने ताकद पणाला लावली आहे.
पीलीभीत येथे १९८९ मध्ये मेनका गांधी या सर्वप्रथम येथून जिंकल्या हाेत्या. मात्र, त्यांना १९९१मध्ये पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर १९९६ पासून मेनका गांधी आणि वरुण गांधी सातत्याने भाजपच्या तिकिटावर जिंकत आले आहेत. वरुण गांधी हे २००९ आणि २०१९मध्ये पीलीभीत येथून जिंकले हाेते. भाजपने मेनका यांना सुलतानपूर येथून उमेदवारी दिली आहे. ही जागा भाजपचा गड मानली जाते. मात्र, काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या प्रसाद यांच्यासाठी येथे आव्हान राहणार आहे.
वरुण गांधी यांनी पीलीभीतच्या लाेकांसाठी भावनिक पत्र लिहिले हाेते. मात्र, प्रचारादरम्यान प्रसाद हे वरुण यांचा उल्लेख टाळत आहेत. ते स्वत:ला माेदींचा दूत आणि पंतप्रधानांच्या नावाने मत मागतात.
१८ लाख मतदार या मतदारसंघात आहेत.
५ विधानसभा मतदारसंघ पीलीभीतअंतर्गत येतात.
१० वर्षांत प्रथमच पंतप्रधानांची सभानरेंद्र माेदी हे जितीन प्रसाद यांच्या प्रचारासाठी सभा घेणार आहेत. यापूर्वी तत्कालीन पंतप्रधान मनमाेहन सिंग यांनी २०१४मध्ये पीलीभीतमध्ये प्रचारसभा घेतली हाेती. गेल्या १० वर्षांमध्ये प्रथमच पंतप्रधान या मतदारसंघात प्रचारासाठी येत आहेत.