'गोमातेच्या नावाने मते मागतात, पण...', अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोदी-योगींवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 22:10 IST2025-03-10T22:09:42+5:302025-03-10T22:10:30+5:30
शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी 17 मार्चपासून आंदोलनाचा इशारा दिला आहे.

'गोमातेच्या नावाने मते मागतात, पण...', अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोदी-योगींवर टीका
Avimukteshwarananda Saraswati : जगद्गुरु शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी गौ मातेच्या संरक्षणाच्या मुद्द्यावरुन केंद्र आणि उत्तर प्रदेशातील भाजप सरकारवर जोरदार टीका केली. गायीला माता मानले जात असेल, तर तिला कायदेशीररित्या आईचा दर्जा मिळायला हवा, अशी मागणी त्यांनी पत्रकार परिषदेतून केली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावरही प्रश्न उपस्थित केले.
गोहत्येच्या मुद्द्यावर फक्त मते मागितली जातात
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ स्वत:ला महान गौप्रेमी असल्याचा दावा करतात, पण गेल्या 11 वर्षातील आकडेवारी वेगळे चित्र दाखवते. गोहत्याबंदीच्या मुद्द्यावर फक्त मते मागितली जातात, पण प्रत्यक्षात ते गायीच्या बाजूने आहेत की नाही, हे स्पष्ट होत नाही. सर्व पक्षांनी ते गोमातेच्या समर्थनात आहेत की विरोधात, हे स्पष्ट करावे. जे विरोधात आहेत, त्यांनीही उघडपणे पुढे यावे. आम्ही त्यांच्या प्रामाणिकपणाचा आदर करू, असेही ते यावेळी म्हणाले.
17 मार्चपासून देशभरात निदर्शने
शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी गायीबाबत आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी राजकीय पक्षांना 17 मार्चपर्यंतची मुदत दिली आहे. ते म्हणाले की, सरकार आणि राजकीय पक्षांनी 17 मार्चपर्यंत गोमाताबाबत आपली भूमिका स्पष्ट केली नाही, तर 17 मार्चपासून आम्ही देशभरात निदर्शने सुरू करू. देशभरातील हे निदर्शन शांततेत होणार असून, ते स्वतः दिल्लीतील रामलीला मैदानात बसणार असल्याचेही सांगितले.
शंकराचार्य पुढे म्हणाले की, 2500 वर्षे जुन्या शंकराचार्य परंपरेत ही पहिलीच वेळ असेल, जेव्हा एखादा शंकराचार्य अशाप्रकारे प्रश्न उपस्थित करून निदर्शने करावी लागतील. हे असे आंदोलन नाही, ज्यामध्ये रस्ते अडवले जातील किंवा जनतेला त्रास दिला जाईल. आमचा उद्देश फक्त सरकार आणि जनतेला जागरूक करणे आहे. सरकारने केवळ निवडणूक आश्वासने न देता, गाईच्या संरक्षणासाठी आणि सन्मानासाठी ठोस पावले उचलली पाहिजेत, असेही ते म्हणाले.