भुवनेश्वर : आयकर विभागाने शुक्रवारी करचुकवेगिरीच्या आरोपाखाली ओडिशा-आधारित मद्य उत्पादन कंपनी समूहाशी संबंधित ठिकाणी सलग तिसऱ्या दिवशी झडती घेतली असता १५६ पिशव्या भरून रोख सापडली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
पिशव्यांमधून आतापर्यंत २० कोटी रुपयांची मोजणी झाली आहे. आतापर्यंत वसूल केलेली एकूण रक्कम २२० कोटी रुपये झाली आहे. विभागाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी बोलंगीर जिल्ह्यातील सुदापाडा येथे छापा टाकून रोख रक्कम असलेल्या तब्बल १५६ पिशव्या जप्त केल्या. त्यापैकी फक्त ६ ते ७ पिशव्यांतील रोख मोजली गेली, ती २० कोटींची भरली. याशिवाय संबलपूर, बोलंगीर, तितलागढ, बौध, सुंदरगड, राउरकेला आणि भुवनेश्वर येथे छापे टाकण्यात आले. विशेष म्हणजे या छाप्यांबाबत कंपनीने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
कंपन्यांवर छापे
पश्चिम ओडिशातील सर्वांत मोठ्या देशी-दारू उत्पादक आणि विक्री कंपन्यांपैकी एक असलेल्या बलदेव साहू अँड ग्रुप ऑफ कंपनीजच्या बोलंगीर कार्यालयावर गुरुवारी छापे टाकून सुमारे २०० कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली होती. बुधवारी सुंदरगढ शहरातील सरगीपाली येथील काही घरे, कार्यालये आणि मद्य उत्पादन कंपन्यांवर छापे टाकण्यात आले. दरम्यान, या प्रकरणी भाजपने काँग्रेसला घेरले असून, प्रमुख नेत्यांवर टीका करण्यात येत आहे.
ओडिशातील सर्वांत मोठी रोकड जप्तीआयकर पथकाने भुवनेश्वरमधील पलासापल्ली येथील बौध डिस्टिलरी प्रायव्हेट लिमिटेडचे कॉर्पोरेट कार्यालय, कंपनीच्या काही अधिकाऱ्यांची घरे, बौध येथील कंपनीचा कारखाना आणि कार्यालय आणि राणी सती राइस मिलची झडती घेतली. माजी आयकर आयुक्त सरत चंद्र दास यांनी सांगितले की, ओडिशातील आयकर विभागाने आतापर्यंत केलेली ही सर्वांत मोठी रोख जप्ती असू शकते.
लुटलेला पैसा जनतेला परत करावा लागेल, ही ‘मोदींची गॅरंटी’ : पंतप्रधानपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी भ्रष्टाचाराच्या मुद्यावर विरोधकांवर टीकास्त्र सोडले. जनतेकडून लुटलेला पैसा तिला परत करावा लागेल, ही ‘मोदींची गॅरंटी’ आहे, असे एक्सवरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे. मोदींनी झारखंडमधील काँग्रेस खासदार धीरज प्रसाद साहू यांच्याशी कथित संबंध असलेल्या एका व्यावसायिक समूहाच्या विविध ठिकाणांहून आयकर विभागाने २०० कोटी रुपये रोख वसूल केल्याच्या बातम्यांना टॅग केले.