उत्तरकाशी - १७ दिवसांपासून बोगद्यात अडकलेल्या कामगारांना बाहेर येत असलेल्या अडचणींची माहिती देण्यात आली नाही. प्रत्येक वेळी त्यांना प्रोत्साहन दिले गेले. ते मोबाईलवर गाणी ऐकत असत. ते फोनद्वारे कुटुंबातील सदस्यांशी बोलू देखील शकत होते. यामुळे त्यांची मानसिक स्थिती ढासळली नाही.
कुटुंबातील सदस्य बोगद्याच्या आत जाऊन अडकलेल्या लोकांशी बोलू शकले. सबा अहमदचा भाऊ नय्यर अहमदने सांगितले की, जेव्हा तो त्याच्याशी बोलायचा तेव्हा तो त्याला समजावून सांगत असे की सर्व काही ठीक चालले आहे.
डॉक्टरांचे पथक सकाळ आणि संध्याकाळ अशा दोन टप्प्यांत पाच तास कामगारांशी बोलत होते. डॉ. प्रेम पोखरियाल यांनी सांगितले की, आम्ही प्रत्येक मजुराच्या आरोग्यासंबंधीच्या समस्या ऐकल्या. त्यानुसार औषधे आत पाठवली जात होती. कामगारांना सतत आतमध्ये ओआरएसचे पाणी पिण्याचा सल्ला दिला जात होता. न्याहारी, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवणही त्यांना वेळेवर पाठवले जात होते.
बचावकार्यातील अडचणींवर कशी केली मात?मजुरांशी पहिल्यांदा असा केला संपर्क मजूर बोगद्यात अडकल्यानंतर त्यांच्याशी संपर्क कसा साधायचा ही मोठी समस्या होती. वॉकीटॉकीही काम करत नव्हता. बचावपथकाला बोगद्यातून आतून पाणी बाहेर काढण्यासाठी टाकलेला एक ४ इंची पाइप आढळला. पाइपजवळून वॉकीटॉकीद्वारे मजुरांशी संपर्क शक्य झाला. या पाइपद्वारेच मग ऑक्सिजन, औषधे, शेंगदाणे, फुटाणे, आदी वस्तू पाठवण्यात यश आले.
मलबा काढला की, तेवढाच पडायचासंपर्क झाल्याने मजुरांच्या सुटकेची आशा निर्माण झाली. मलबा काढून मजुरांना बाहेर काढणे एवढी सोपी योजना तेव्हा वाटत होती. ३५ अश्वशक्तीच्या ऑगर मशिनद्वारे मलबा काढण्यास सुरुवात केली; परंतु लगेच बोगद्यातील माती ढासळली. असा प्रकार वारंवार होऊ लागला. ९०० मि.मी. पाइप टाकण्याची युक्ती कामाला आली.
कामाची मंदगती अन् वाढता ताण...- ड्रिलिंग करून ९०० मि.मी. पाइप टाकणे सुरू होते; परंतु या कामाची गती फारच कमी होती. त्यामुळे २५ टन वजनाची अमेरिकी ऑगर मशीन हर्क्युलस विमानाद्वारे घटनास्थळी आणण्यात आली. - २०० अश्वशक्तीची ही मशिन तासात ५ मीटर ड्रिलिंग करू शकत होती, तर आधीची मशीन केवळ १ मीटर. नव्या अजस्र मशिनने काम चोख बजावले. २५ मीटरपर्यंत पाइप टाकण्यात आले.
शेवटचा टप्पा महत्त्वाचा...नऊ दिवस झाले तरी सुटकेच्या दिशेने प्रगती न झाल्याने अखेर ५ बाजूंनी ड्रिलिंगची योजना बनवण्यात आली. ती यशस्वी ठरली.
भविष्यवाणी खरी ठरली...४१ मजुरांना सुखरूप बाहेर काढण्यावरून प्रसिद्धीच्या झोतात आलेले या परिसराचे आराध्य दैवत बाबा बौखनाग यांची भविष्यवाणी खरी ठरली. कामगारांना बाहेर काढण्याच्या त्यांच्या प्रयत्नात अडथळे येत असल्याचे पाहून बोगद्याशी संबंधित अधिकारी बाबा बौखनाग यांचे स्थान असलेल्या भाटिया गावात पोहोचले आणि कामगारांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी प्रार्थना केली होती. त्यावर मजुरांची तीन दिवसांत सुटका होईल, असा आशीर्वाद दिला गेला. त्यानंतर कामात अडथळा आला नाही, तिसऱ्याच दिवशी कामगारांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला. बौखनागला या परिसराचे रक्षक मानले जाते.
व्हिडीओ गेम्स खेळण्यासाठी पाठविले मोबाइल...- कामगारांना आधी एनर्जी ड्रिंक्स पाठवण्यात आले, पण नंतर त्यांना पूर्ण जेवण देण्यात आले. कामगार स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी आत योगासने करत होते. सकाळ संध्याकाळ बोगद्याच्या आत फिरत होते. - मजुरांना झोपण्यासाठी त्रास झाला असता, परंतु सुदैवाने आतमध्ये जिओटेक्स्टाइल शीट होती, ज्याचा वापर मजुरांनी झोपण्यासाठी केला. त्यांना व्हिडीओ गेम्स खेळण्यासाठी मोबाइल पाठवले होते.
मुलासाठी पत्नीचे दागिने गहाण ठेवून आला बाप...- बोगद्यात अडकलेल्या मुलापर्यंत पोहोचण्यासाठी एका वडिलांनी चक्क पत्नीचे दागिने सोनाराकडे गहाण ठेवत उत्तरकाशी गाठली. मंजित या कामगाराचे वडील चौधरी म्हणाले की, माझ्या एका मुलाचा अपघातात मृत्यू झाला आहे. आता एक बोगद्यात अडकला आहे. त्यामुळे मुलाला नेण्यासाठी सोने गहाण ठेवत येथे आलो. - सोने गहाण ठेवल्याने नऊ हजार रुपये मिळाले. आता २९० रुपये शिल्लक आहेत. मात्र, मुलाला घरी नेण्याचा आनंद सर्वांत मोठा आहे. आज निसर्गही आनंदी दिसत असून थंड वाऱ्याने झाडे, पाने डोलत आहेत. आम्हाला कपडे आणि सामान तयार ठेवण्यास सांगितले होते. - कामगारांना बाहेर काढल्यानंतर आम्हालाही त्यांच्याकडे पाठवण्याची व्यवस्था केली. एक झाड राहिलेले होते ते पुन्हा मिळाले, असे ते म्हणाले. यावेळी त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. ते सतत हाताने डोळे पुसत होते. त्यांचा हा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे.
दिवसरात्र ‘परका’ राबला, आता कौतुकाचा वर्षाव...ऑस्ट्रेलियाचे मायक्रोटनलिंग तज्ज्ञ अरनाॅल्ड डिक्स यांना भारत सरकारने सल्लागार म्हणून बचाव कार्यात सामील होण्यासाठी आमंत्रित केले होते. त्यानंतर त्यांनी अनेक दिवस आणि रात्र बोगद्याच्या बाहेर बचाव कर्मचार्यांसोबत घालवली. मंगळवारी त्यांनी बाबा बौखनाग यांची पूजा केली. उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीही त्यांचे कौतुक केले.