पाटणा - राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांचे चिरंजीव तेज प्रताप यादव यांनी घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. इच्छेविरुद्ध ऐश्वर्या रायशी लग्न लावण्यात आल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचा दावा आता तेज प्रताप यांनी केला आहे. 'मी एक साधाभोळा माणूस आहे. इच्छेविरुद्ध माझं ऐश्वर्या राय बरोबर राजकीय फायद्यासाठी जबरदस्तीने लग्न लावण्यात आलं. तेव्हापासून माझा कोंडमारा सुरु होता' असे राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेज प्रताप यादव यांनी म्हटलं आहे.
'मला लग्न करायचं नव्हतं हे मी माझ्या आई-वडिलांना सांगितलं होतं. पण त्यावेळी कोणीच माझं ऐकल नाही. आमच्या दोघांची मन जुळत नाहीत. आमचे स्वभाव भिन्न आहेत. माझ्या सवयी सामान्य आहेत. तर ऐश्वर्या आधुनिक विचारांची मुलगी आहे. दिल्लीमध्ये तिचे शिक्षण झाले. त्यामुळेच तिला शहरी आयुष्य जगण्याची सवय आहे' असेही तेज प्रताप यांनी सांगितले.
ऐश्वर्या आणि तेज प्रताप यांच्या वैवाहिक जीवनात कलह निर्माण झाला आहे. त्यामुळे तेज प्रताप यादव यांनी थेट घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. याबाबत माहिती मिळताच, ऐश्वर्या यांचे वडिल आणि बिहारचे माजी मंत्री चंद्रिका राय यांनी लालू प्रसाद यादव यांचे घर गाठले. तसेच घटस्फोटाच्या निर्णयाबाबत चर्चाही केल्याचे समजते. विशेष म्हणजे याच वर्षी 12 मे रोजी धुमधडाक्यात तेज प्रताप यांचा विवाह झाला होता. मात्र, सहा महिन्यांतच दोघांच्या नात्यामध्ये कटुता निर्माण झाली. मी ऐश्वर्यासोबतच नातं पुढे नेऊ इच्छित नसल्याचे तेजप्रताप यांनी म्हटलं आहे. दरम्यान, लालूप्रसाद यादव सध्या रांचीतील राजेंद्र इस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस येथील पेईंग वॉर्डमध्ये आहेत. चारा घोटाळाप्रकरणी ते शिक्षा भोगत आहेत.