नवी दिल्ली : पतीने अल्पवयीन नसलेल्या पत्नीला लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्यास बलात्काराच्या गुन्ह्यासाठी पतीला खटल्यातून सूट द्यावी का, या बहुचर्चित कायदेशीर प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयात पुढील आठवड्यात सुनावणी होणार आहे.
सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायाधीश जेबी पारडीवाला आणि न्यायाधीश मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने वैवाहिक बलात्काराच्या मुद्यावरील याचिकांवर सुनावणी व्हावी, या ज्येष्ठ वकील करुणा नंदी यांच्या युक्तिवादाची सोमवारी दखल घेतली.
सरन्यायाधीशांनी या याचिकांवर पुढील आठवड्यात सुनावणी होणार असल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले की, खंडपीठ या आठवड्यात करविषयक कायद्यांशी संबंधित अनेक प्रकरणांचा निपटारा करण्यात व्यस्त आहे.
कायदा काय?
कलम ३७५च्या कलमांतर्गत पतीने जर अल्पवयीन नसलेल्या पत्नीसोबत संबंध ठेवल्यास त्याला बलात्कार समजले जात नाही, असे यापूर्वी होते. नवीन कायद्यानुसार, जर पत्नीचे वय १८पेक्षा अधिक असेल तर लैंगिक संबंध बलात्कार मानता येत नाही.