नवी दिल्ली - पाकिस्तानच्या हांगु जिल्ह्यामध्ये शीख धर्मियांचे जबरदस्तीने धर्मांतर केले जात आहे. शिखांना इस्माल धर्म स्वीकारायला भाग पाडले जात असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यावर भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी चिंता व्यक्त केली आहे. आम्ही पाकिस्तान सरकारकडे हा विषय उपस्थित करु. पाकिस्तानातील सर्वोच्च पातळीपर्यंत आम्ही शिखांच्या हक्कासाठी दाद मागू. हांगुमध्ये शिखांचे जबरदस्तीने धर्मांतर केले जात आहे असे सुषमा स्वराज यांनी टि्वटरवर म्हटले आहे.
पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी टि्वटरच्या माध्यमातून सुषमा स्वराज यांना हांगु जिल्ह्यात जबरदस्तीने सुरु असलेल्या धर्मांतराची माहिती दिली. पाकिस्तानी नेतृत्वाच्या सर्वोच्च स्तरावर हा मुद्दा उपस्थित करण्याचीही त्यांनी विनंती केली. शीख समाजावरील अन्याय सहन करता येणार नाही. शीख म्हणून ओळख सुरक्षित ठेवण्यासाठी मदत करणे आपले कर्तव्य आहे असे कॅप्टन अमरिंदर यांनी सांगितले.
हांगु जिल्ह्यात खैबर-पख्तुनखवा प्रांतात सरकारी अधिकारी जबरदस्तीने शीख समुदायातील नागरिकांचे धर्मांतर करत असल्याचे वृत्त 16 डिसेंबरला ट्रीब्युन या पाकिस्तानी वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाले होते. शीख समुदायातील नागरिकांनी या विरोधात हांगुच्या उपायुक्तांकडे रीतसर तक्रारही दाखल केली होती. सहाय्यक आयुक्त याकूब खान जबरदस्तीने धर्मांतर करत असल्याचे तक्रारीत म्हटले होते. आम्ही दोआबा भागातील रहिवाशी असून आमचा धार्मिक मुद्यावरुन छळ केला जातो. संविधानाने आम्हाला धार्मिक स्वातंत्र जपण्याचा अधिकार दिला आहे. त्यामुळे तुम्ही या संपूर्ण प्रकरणात लक्ष घालून चौकशी करावी असे तक्रारीत म्हटले होते.