ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ८ - टॅक्सीमध्ये एका २३ वर्षीय बेल्जियन महिलेचा विनयभंग करणा-या ओलाच्या टॅक्सी चालकाला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. राज सिंह असे आरोपीचे नाव असून, तो राजस्थान अल्वरचा आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार महिलेने गुरगाव येथून दिल्लीत सीआर पार्कमध्ये जाण्यासाठी ओलाची टॅक्सी पकडली.
ही महिला टॅक्सीमध्ये असताना फोनमधल्या जीपीएसवरुन आपण योग्य मार्गावर आहोत की, नाही ते तपासत होती. ड्रायव्हरने एका ठिकणी मार्ग बदलला. जेव्हा महिलेने त्याला विचारले तेव्हा त्याने शॉर्टकटने नेत असल्याचे सांगितले. या दरम्यान तक्रारदार महिलेने या सर्व घटनेची फोनवरुन तिच्या मैत्रिणीला माहिती दिली होती.
महिलेच्या तक्रारीनुसार ड्रायव्हरने या महिलेला पुढच्या सीटवर शेजारी बसण्यासाठी बोलवले. जेव्हा ही महिला फ्रंटसीटवर बसली तेव्हा ड्रायव्हरने या महिलेला खाली पाडले व जबरदस्तीने तिचे चुंबन घेतले. ड्रायव्हरने आपल्या मोबाईलमधून सर्व कॉल्सची हिस्ट्री सुद्धा डिलीट केली असा या महिलेने आरोप केला आहे.
या महिलेने जेव्हा विरोध केला तेव्हा ड्रायव्हरने तिला गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी दिली. पोलिसात तक्रार केली तर, ठार मारु अशी त्याने धमकीसुद्धा दिली. गोविंदपुरी येथे ही महिला टॅक्सीतून उतरली. त्यानंतर तिने लगेच आपल्या मैत्रिणीला फोन करुन घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. संबंधित महिलेने दिल्ली पोलिसात तक्रार दाखल केली. ओलाने या चालकाला तात्काळ निलंबित केले आहे.