नवी दिल्ली : अमेरिकी कार निर्माता कंपनी फोर्डने भारतीय बाजारपेठेत प्रवेश करून 20 वर्षे झाली. मात्र, ही कंपनी आजतागायत तोट्यातच चालविली जात होती. डिलर्स कडून ग्राहकांची लुटालूट, महिंद्रा कंपनीसोबत वर्षभरातच मोडलेला सहकार्य करार आणि भारतीय मानसिकतेमध्ये झालेली बदनामी या मागे असली तरीही फोर्डने तब्बल वीस वर्षानंतर नफा कमविला आहे.
फोर्डने भारतात फोर्ड इंडिया नावाची उपकंपनी 1995 मध्ये स्थापन केली होती. स्पेअरपार्ट आणि इतर सेवांसाठी त्यांनी महिंद्रा आणि महिंद्रा या कंपनीशी करार केला होता. मात्र, काही कारणास्तव हा करार मोडला आणि फोर्डच्या ग्राहकांना स्पेअरपार्ट मिळेनासे झाले. यानंतर खरी फोर्डची व्यावसायिक स्पर्धा आणि भारतीय ग्राहकांकडून बदनामी सुरु झाली. लाखो इन्व्हेस्ट करून परतावा काहीच मिळत नसल्याने डीलरनीही ग्राहकांना लुबाडायला सुरुवात केली आणि फोर्डची अधोगती सुरु झाली.
फोर्ड या कंपनीच्या कार प्रामुख्याने सुरक्षेसाठी ओळखल्या जातात. मात्र, सुरुवातीच्याच काळात झालेल्या बदनामीमुळे फोर्डला पुन्हा भारतीयांमध्ये स्थान मिळविण्यास खूप झगडावे लागले. प्रथम फोर्डने प्रतिस्पर्ध्यांपेक्षा कमी दरात सर्व्हिस देण्याचे वचन द्यावे लागले. तसेच कमी किंमतीत स्पेअरपार्टही द्यावे लागले. नकारात्मक जाहिराती करत ग्राहकांच्या मनात उतरण्याचा प्रयत्न केला. यासाठी फोर्डला 20 वर्षे खस्ता खाव्या लागल्या. फोर्ड फिगो, अस्पायर, इकोस्पोर्ट सारख्या ग्राहकांच्या खिशाला परवडणाऱ्या कार भारतीय बाजारात आणल्या आणि रुप पालटले.
फोर्डने खर्च कमी करण्यासाठी भारतातील काही कंपन्यांशी करार केले. ही रणनिती कामी आली आणि फोर्डने 2015-16 मध्ये 2.1 अब्ज डॉलर्सवरून 2016-17 2.8 अब्ज डॉलर्स आणि 2017-18 3.4 अब्ज डॉलर्सचा व्यवसाय केला. फोर्डने कार्पोरेट अफेअर्स मंत्रालयाकडे दाखल केलेल्या अहवालात ही बाब म्हटली आहे.
भारतातील आघाडीची कंपनी मारुती सुझुकीला एक हॅचबॅक विकसित करण्यासाठी 1 हजार कोटी खर्च आला. तर फोर्डला अस्पायर प्लॅटफॉर्म विकसित करण्यासाठी 3500 कोटींचा खर्च आला होता. उलट मारुतीने या हॅचबॅकच्या विक्रीतून दरवर्षी 8 हजार कोटींचा नफा कमविला होता. सध्या फोर्डने महिंद्रा सोबत पुन्हा सहकार्य करार केला असून 2020 मध्ये या कंपनीच्या तीन नवीन कार लाँच होणार आहेत. तसेच फोर्डने काही अब्ज डॉलर्सची रक्कम अमेरिकेबाहेरील बाजारात गुंतविण्याचे ठरविले आहे.