हरीश गुप्ता
नवी दिल्ली :
जुलै २०२२ पर्यंतच्या समोर आलेल्या आकडेवारीनुसार, भारतात सुमारे ३,३०० परदेशी कंपन्या कार्यरत आहेत, तर आतापर्यंत तब्बल १,७७७ विदेशी कंपन्यांनी भारतातील काम थांबविले आहे.
कंपनी व्यवहार मंत्रालयाकडील उपलब्ध आकडेवारीनुसार, जुलै २०२२ पर्यंत ५,०६८ परदेशी कंपन्यांची भारतात नोंदणी झालेली आहे. मात्र, त्यातील ३,२९१ कंपन्या कामकाजात सक्रिय आहेत. सुमारे ५० टक्के विदेशी कंपन्यांनी विविध कारणांमुळे भारतातील कामकाज थांबविले आहे.
सध्या कोणताही प्रस्ताव प्रलंबित नाहीप्राप्त माहितीनुसार, रिझर्व्ह बँकेकडून परवानगी मिळाल्यानंतर कोणत्याही परदेशी कंपनीला दिल्लीत कंपनी निबंधकांकडे नोंदणी करणे नियमानुसार बंधनकारक आहे. २०२२ मध्ये देशात सर्वाधिक परदेशी कंपन्या कार्यरत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. सध्या कोणत्याही परदेशी कंपनीकडून नोंदणी रद्द करण्यासाठी आलेले प्रस्ताव कंपनी व्यवहार मंत्रालयाकडे प्रलंबित नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
कोणत्या कारणाने कंपन्या बंद - परदेशी कंपन्या भारतातील कामकाज विविध कारणांमुळे बंद करू शकतात. - भारतातील शाखेचे कामकाज थांबणे अथवा भाडेकरार संपणे व रिझर्व्ह बँकेने दिलेली वैधता संपणे, आदींचा कारणांमध्ये समावेश आहे.- अनेकदा पालक कंपनीच्या धोरणात बदल झाल्यामुळे परदेशी कंपन्या भारतातील कामकाज बंद करतात. नंतर ते कधीच सुरू केले जात नाही.