नवी दिल्ली - देशातील काही राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. तेलंगणामध्ये देखील पावसामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. याच दरम्यान तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी एक अजब दावा केला. राज्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमागे विदेशी हात असून ढगफुटी हा एक कट असल्याचं चंद्रशेखर राव यांनी म्हटलं आहे. भद्रचलम येथील पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आयोजित केलेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये राव यांनी हे विधान केलं आहे.
मुख्यमंत्र्यांनी देशातील काही भागांमध्ये झालेल्या ढगफुटीच्या घटनांमागे विदेशी हात असल्याची माहिती माझ्याकडे आहे असं म्हटलं आहे. तसेच राज्यातील गोदावरी नदीच्या पर्जन्यकक्षेत झालेल्या ढगफुटीही याच कटाचा भाग असल्याची शक्यता मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवली. तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी भद्रचलम येथील पूरग्रस्त भागाची रविवारी पहाणी केली. त्यांनी या भागाला एक हजार कोटींचा मदतनिधी जाहीर केला आहे. मात्र सध्या त्यांच्या विधानाची जोरदार चर्चा रंगली आहे.
"ढगफुटी हा नवीन प्रकार समोर येऊ लागला आहे. हे किती खरं आहे मला ठावूक नाही. आपल्या देशाशी शत्रुत्व असणारे काहीजण देशात वेगवगेळ्या ठिकाणी ढगफुटी घडवून आणत आहेत. यापूर्वी त्यांनी काश्मीर, लेह-लडाख, त्यानंतर उत्तरखंडमध्ये हे घडवून आणलं आणि आता आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार ते गोदावरीच्या परिसरामध्ये हे घडवून आणत आहेत" असं मुख्यमंत्री बैठकीमध्ये म्हटलं आहे. याआधी त्यांनी या भागाची हवाई पाहणी सुद्धा केली होती. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
आंध्र प्रदेशमध्येही पूरामुळे लोक हैराण झाले आहेत. कोनासीमा जिल्ह्यातील पेडापट्टनमलंकामधील एक व्हिडीओ समोर आला आहे. पुराने वेढलेल्या भागात बोटीच्या सहाय्याने एका नवरीने आपल्या कुटुंबासह नवदेवाचे घर गाठल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कोनसीमा जिल्ह्यातील पेडापट्टनमलंकामधील एका कुटुंबाने जुलैमध्ये आपल्या मुलीचं लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण, मुसळधार पावसामुळे आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. पुढच्या महिन्यात पावसाची स्थिती आणखी बिघडण्याची शक्यता वर्तवण्यात आल्यामुळे जुलै महिन्यातच प्रशांतीचे लग्न करण्याचा निर्णय तिच्या कुटुंबीयांनी घेतला. परंतु, पूर परिस्थितीमुळे वाहनांचा वापर करणे शक्य नव्हते. त्यामुळे अखेर बोटीच्या सहाय्याने प्रशांती आणि कुटुंबीयांनी नवरदेवाचे घर गाठत गाठले आणि दोघांचे लग्न लावण्यात आले.