नवी दिल्ली : काश्मीरप्रश्नी मध्यस्थी करण्यासाठी भारताने मदत मागितल्याचा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला आहे. यावरुन मंगळवारी संसदेच्या दोन्ही सभागृहात गदारोळ सुरु झाला. यावेळी काश्मीर हा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय मुद्दा आहे. या मुद्द्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून कोणतीही प्रकारची मध्यस्थीसाठी बोलणी झाली नसल्याचे पराराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी सांगितले.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल जो काही दावा केला आहे. तो चुकीचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासंबंधीची कोणतीही मागणी केली नाही, असे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी राज्यसभेत सांगितले. तसेच, भारताकडून सतत सांगण्यात येत आहे की पाकिस्तानसोबत जी काही चर्चा होणार आहे. ती फक्त द्विपक्षीय आहे. पाकिस्तानसोबत कोणत्याही मुद्दयावर चर्चा होऊ शकते. मात्र, त्यांच्याकडून दहशतवाद्यांविरोधात कारवाई झाली पाहिजे. शिमला आणि लाहोर समझौता ज्याप्रकारे झाला. त्याचप्रकारे पाकिस्तानसोबत प्रत्येक मुद्दा द्विपक्षीय चर्चेने सोडविला जाऊ शकतो, असेही परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी सांगितले.
याचबरोबर, काश्मीरप्रश्नी मध्यस्थी करण्यासाठी भारताने मदत मागितल्याचा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेला दावा भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने फेटाळून लावला आहे. तसेच काश्मीर प्रश्नासह भारत आणि पाकिस्तानमधील अन्य विवादांवर द्विपक्षीय चर्चेतूनच तोडगा काढला गेला पाहिजे, या आपल्या जुन्या भूमिकेचाही परराष्ट्र मंत्रालयाकडून पुनरुच्चार करण्यात आला.
दरम्यान, नरेंद्र मोदी आणि माझे चांगले संबंध आहेत, काश्मीर प्रश्नावर मोदींनी माझ्याकडे मदत मागितली होती. मलादेखील भारत आणि पाकिस्तानमधील या मुद्द्यावर मध्यस्थी करण्यास आवडेल, असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता. मात्र ट्रम्प यांचा हा दावा भारताने स्पष्ट शब्दात फेटाळला आहे.