S Jaishankar: आपल्याला चांगली रणनीती, व्यूहरचना बनवायची असेल तर आपल्याला भारतीय महाकाव्य आणि कथांमधून शिकावे लागेल. जेव्हा भगवान श्रीकृष्णाने सूर्यास्ताचा आभास निर्माण केला. त्यामुळे आपण वाचलो असे जयद्रथला वाटले. पण तसे झाले नाही. चांगल्या रणनीतीचे हे उत्तम उदाहरण आहे, असे सांगत भगवान श्रीकृष्ण आणि हनुमान हे जगातील सर्वांत महान मुत्सद्दी होते, असे प्रतिपादन भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी केले.
एस. जयशंकर हे त्यांचं पुस्तक ‘द इंडिया वे : स्ट्रॅटेजीज फॉर अॅन अनसर्टन वर्ल्ड’च्या प्रकाशनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. एस. जयशंकर यांच्या पुस्तकाचे मराठीत भाषांतर करण्यात आले आहे. ‘भारत मार्ग’ असे या भाषांतर केलेल्या मराठी पुस्तकाचे नाव आहे. महाभारतातील श्रीकृष्ण आणि जयद्रथाच्या कथेचा दाखला देताना एस. जयशंकर म्हणाले की, हे उदाहरण देण्याचे कारण म्हणजे परिस्थिती काहीही असो, विश्लेषण काहीही असो, आपण इतरांच्या किंवा पाश्चात्य कथांबाबत सहज बोलतो. ट्रोजन हॉर्स किंवा गॉर्डियन नॉट कथांबद्दल काही म्हणणे नाही. त्या कथा वाचल्याही आहेत. पण देशवासियांना हे सांगायचे आहे, तुम्हीही आपले साहित्य, कथा यांचे वाचन केले पाहिजे. जर खरोखरच रणनीतीची संस्कृती आपल्याला निर्माण करायची असेल, तर ती आपल्या कथा आणि महाकाव्यांमधून तयार होईल, असे जयशंकर यांनी सांगितले.
भगवान श्रीकृष्ण आणि हनुमान हे जगातील सर्वांत महान मुत्सद्दी
श्रीकृष्णाने आपल्याला धैर्य कसे राखायचे ते शिकवले. कृष्णाने शिशुपालाचे १०० अपराध माफ केले. परंतु त्यानंतर त्याचा वध केला. भगवान श्रीकृष्ण आणि हनुमान हे जगातील सर्वात महान मुत्सद्दी आहेत. हनुमान तर मुत्सद्देगिरीच्याही पलीकडे गेले होते. ते लंकेला गेले, तिथे त्यांनी सीतेशी संपर्क साधला, लंकेला आगही लावली, अशी उदाहरणे जयशंकर यांनी दिली.
दरम्यान, कौरव आणि पांडवांमध्ये महाभारताचे युद्ध झाले होते. लोक असे म्हणतात की, इतिहास आणि धार्मिक ग्रंथांमधून आपल्याला नवा दृष्टीकोन मिळतो. मुत्सद्देगिरीच्या दृष्टीकोनातून आपण श्रीकृष्णाकडे आणि हनुमानाकडे पाहिले तर त्यांच्या महानतेची प्रचिती येते. ते कोणत्या परिस्थितीत होते, त्यांना कोणते मिशन दिले होते, ते मिशन हनुमानाने कसे पूर्ण केले. आपल्या इंटेलिजन्सचा परिचय देत ते इतक्या पुढे गेले की, त्यांनी मिशन तर पूर्ण केलेच, परंतु त्यापुढे जाऊन त्यांनी लंकादेखील जाळून टाकली, असे जयशंकर यानी सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"