परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पुन्हा एकदा रामायणातील पात्रांद्वारे भारताची जागतिक भूमिका अधोरेखित केली आहे. भारतीय विचार केंद्र (BVK) या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) संलग्न संस्थेने आयोजित केलेल्या एका व्याख्यानाला संबोधित करताना ते म्हणाले की, "ज्याप्रमाणे रामायणात प्रभू राम आणि लक्ष्मण यांची जोडी होती, त्याचप्रमाणे प्रत्येक देशाला आपल्या आजुबाजूला मजबूत मैत्री आवश्यकता आहे."
"वेगाने विकसित होत असलेल्या भारताने जागतिक स्तरावर मोठी भूमिका बजावण्यास तयार असले पाहिजे. आपण आपला इतिहास, आपली सभ्यता विसरू नये कारण या गोष्टी आपल्याला उर्वरित जगापासून वेगळे करतात."
आर्थिक आणि वैज्ञानिक आघाडीवर झपाट्याने विकसित होत असलेल्या भारताच्या आजूबाजूच्या शेजाऱ्यांच्या सुरक्षेचा संदर्भ देत एस जयशंकर म्हणाले की, सध्याच्या काळात भारताची बदलती जागतिक परिस्थिती महत्त्वाची आहे. कारण आज भारताच्या शेजाऱ्यांना अधिक सुरक्षित वाटतं आणि त्यांचा भारताप्रती विश्वास आणि आदर वाढला आहे. जागतिक महामारी कोरोनाचे उदाहरण देताना ते म्हणाले की, त्यावेळीही जगाने भारतावर हाच विश्वास ठेवला होता.
जागतिक स्तरावर अनेक आघाड्यांवर भारतालाही आव्हानांचा सामना करावा लागला आहे. याचा संदर्भ देत जयशंकर यांनी पुन्हा एकदा रामायणाचा संदर्भ दिला आणि सांगितलं की, परशुरामाने प्रभू रामाची जशी परीक्षा घेतली होती तशीच सर्व देशांनी आपल्या शेजारील देशांची परीक्षा घेतली पाहिजे. जेव्हा देश विकसित होतात तेव्हा त्यांच्या बाबतीत असंच घडतं. आपलाच देश घ्या. आमच्या मजबूत अर्थव्यवस्थेमुळे आम्ही ही खडतर परीक्षा पास केली. अणुचाचणी करून आम्ही दुसरी चाचणी पास केली. आपल्यालाही रामासारखी परीक्षा द्यावी लागेल. परशुरामाने ज्या प्रकारे रामाची परीक्षा घेतली.
याआधीही जयशंकर यांनी अनेक प्रसंगी रामायणाचा उल्लेख केला होता. अलीकडेच त्यांच्या 'व्हाय इंडिया मॅटर्स' या पुस्तकावरील चर्चेदरम्यान त्यांनी "रामायणात अनेक महान डिप्लोमॅट होऊन गेले आहेत. प्रत्येकजण हनुमानाबद्दल बोलतो. पण अंगदही तिथे होता. राजनैतिक पातळीवर सर्वांनी योगदान दिले आहे. भारतात आपण राम-लक्ष्मण या जोडीचं नाव घेतो. म्हणजे दोन भाऊ जे कधीही वेगळे होणार नाहीत. त्याचप्रमाणे देशांनाही अशा अतूट संबंधांची गरज आहे" असं म्हटलं होतं.