नवी दिल्लीः केंद्रातल्या मोदी सरकारनं जम्मू-काश्मीरमधल्याकलम 370मधील तरतुदी शिथिल करून त्याचे दोन प्रदेशात विभाजन केले आहे. जम्मू-काश्मीर आणि लडाख असे दोन केंद्रशासित प्रदेश तयार केल्यापासून पाकिस्तान भारताविरोधात आंतरराष्ट्रीय स्तरावर आगपाखड करत आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान सैरभैर झाले असून, त्यांनी संयुक्त राष्ट्रासह इतर जगातील देशांना या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. पाकिस्तानला कुठूनही या प्रकरणात मदत मिळालेली नाही. चीननंही पाकिस्तानकडे पाठ फिरवलेली आहे. त्यानंतर आता भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी पत्रकार परिषद घेत पाकिस्तानवर निशाणा साधला आहे.भारतानं जगासमोर स्वतःचा पक्ष ठेवला आहे. आम्ही जो निर्णय घेतला आहे, तो आमचा अंतर्गत विषय आहे. पाकिस्तान जीसुद्धा पावलं उचलतो आहे. तो सैरभैर झाल्यामुळेच असं करतोय. पाकिस्ताननं हवाई हद्द बंद करण्याचा जो निर्णय घेतला आहे, तसेच इतर जे काही रागाच्या भरात निर्णय घेत सुटला आहे, त्याचा पुनर्विचार करण्याचा आम्ही सल्ला दिला आहे. जगाचं लक्ष स्वतःकडे आकर्षित करण्यासाठीच पाकिस्तान असं करतोय. पाकिस्ताननं आंतरराष्ट्रीय स्तरावर जरी हा मुद्दा उपस्थित केला, तर तिथेसुद्धा आम्ही त्यांना उत्तर देऊ, आम्ही जगातल्या अनेक राष्ट्रांना सांगितलं आहे की, हा आमचा अंतर्गत विषय आहे.
जगासमोर कलम 370चा मुद्दा उपस्थित करणं बंद करा; भारताचे पाकला खडे बोल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2019 6:28 PM