- सुरेश भटेवरा, नवी दिल्ली
परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने शुक्रवारी परदेशातील भारतीय नागरिकांसाठी स्वत:चे स्वतंत्र फेसबुक अॅप सुरू केले आहे. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात परदेशस्थ भारतीयाला अचानक कोणत्याही समस्येला सामोरे जाण्याची वेळ आली तर परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज यांच्याकडून मदतीच्या अपेक्षेबाबत त्यांना या नव्या अॅपमुळे यापुढे नाराज व्हावे लागणार नाही. त्यांना लगेच मदत मिळेल.या फेसबुक अॅपविषयी माहिती देतांना मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप म्हणाले, फेसबुक पेजवर सर्वात वरच्या भागात असलेल्या भारतीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या अॅपवर क्लिक केल्यास जगाच्या पाठीवर आपण कोणत्याही देशात असलात तरी, सर्वप्रथम साऱ्या जगाचा नकाशा उघडेल. त्यात प्रत्येक देशातील भारतीय दूतावास अधोरेखित केले असून, संबंधित दूतावासावर क्लिक केल्यास तेथील उच्चायुक्त कार्यालये, कॉन्स्युलेटस, विदेशातील भारतीय कार्यालये इत्यादींची समग्र माहिती, दूतावासांसह अधिकाऱ्यांचे पत्ते, फोन नंबर्स आदी उपलब्ध होईल. त्याद्वारे भारतीयांना संबंधित देशातील भारतीय दूतावासावर क्लिक करून तेथील संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आपल्या समस्येचे निराकरण करणे शक्य होईल.स्वरूप पुढे म्हणाले, परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज स्वत: व्टिटरच्या माध्यमातून २४ तास साऱ्या जगाच्या संपर्कात असतात. विविध देशांतून अनेक लोक ट्वीट करून आपल्या समस्या त्यांना कळवतात. प्रत्येकाला त्या उत्तर देतात आणि त्यांची समस्या संबंधित राजदूताला कळवतात. आजवर कोणालाही त्यांनी नाराज केले नाही.तक्रार निवारणाचा भार कमी होणारतथापि त्यातून एक महत्त्वाची बाब मंत्रालयाच्या निदर्शनाला आली की त्यातली अनेक निवेदने असतात की ज्याची उत्तरे स्वत: परराष्ट्र व्यवहारमंत्र्यांनी देण्याची आवश्यकता नाही. संबंधित देशातील भारतीय राजदूत अथवा त्यांचे कार्यालय ते काम सहजपणे करू शकते. परराष्ट्र व्यवहारमंत्र्यांचा तक्रार निवारणाचा भार कमी करण्यासाठी आणि परदेशातील भारतीयांच्या समस्या लवकर सोडवण्यासाठी या फेसबुक अॅपचा उपयोग होईल.