नवी दिल्ली- 2017 हे वर्ष भारतीय पर्यटन क्षेत्राला नवी ऊर्जा देणारे ठरले आहे. या वर्षभरात भारताला 1 कोटी पर्यटकांनी भेट दिली आहे. त्यामुळे भारताला 27 अब्ज डॉलर्स इतके उत्पन्नही मिळाले आहे. परदेशी पर्यटकांनी भारतात येण्याचा हा नवा उच्चांक प्रस्थापित झाल्यामुळे या क्षेत्रात उत्साहाचे वातावरण आहे. 2018मध्येही अशाच प्रकारे मोठ्या संख्येने पर्यटक भारतात येतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.याबाबत कोची येथे बोलताना केंद्रीय पर्यटन मंत्री के. जे. अल्फोन्स म्हणाले, "पर्यटन क्षेत्राची वाढ चांगल्या प्रकारे होत आहे. भारतामध्ये प्रत्येक व्यक्तीला देण्यासारखं सर्वकाही उपलब्ध असल्यामुळे पर्यटकांची संख्या अजूनही भरपूर वाढेल अशी मला आशा आहे. लोकांना सेवा देण्यासाठी आम्ही आणखी प्रयत्न करत आहोत."देशाच्या जीडीपीमध्ये पर्यटनक्षेत्राचा वाटा 6.88 टक्के इतका असून 2017मधील एकूण रोजगारांमध्ये 12 टक्के रोजगार या क्षेत्रात होते. असेही अल्फोन्स म्हणाले. यामुळे टुरिझम कॉम्पिटिटिव्ह इंडेक्समध्ये भारताची क्रमवारी सुधारली आहे. 2013 साली भारताचा क्रमांक 65 होता तो आता 2017 साली 25 वर गेला आहे. केंद्र सरकारने सुरु केलेल्या नव्या स्वदेश दर्शन योजनेमुळे पायाभूत सुविधांचा विकास झाला आहे आणि त्यामुळे पर्यटन क्षेत्राचा विकास होत असल्याचे मत मांडले जात आहे. त्याचप्रमाणे ईशान्य भारतातील राज्यांमध्येही पर्यटन क्षेत्र वृद्धींगत होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत त्यामुळेही पर्यटकांची संख्या वाढत आहे.
2017 मध्ये 1 कोटी परदेशी पयर्टकांनी दिली भारताला भेट, 27 अब्ज डॉलर्सची कमाई
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2018 12:22 PM
2017 हे वर्ष भारतीय पर्यटन क्षेत्राला नवी ऊर्जा देणारे ठरले आहे. या वर्षभरात भारताला 1 कोटी पर्यटकांनी भेट दिली आहे. त्यामुळे भारताला 27 अब्ज डॉलर्स इतके उत्पन्नही मिळाले आहे.
ठळक मुद्देदेशाच्या जीडीपीमध्ये पर्यटनक्षेत्राचा वाटा 6.88 टक्के इतका असून 2017मधील एकूण रोजगारांमध्ये 12 टक्के रोजगार या क्षेत्रात होते.रिझम कॉम्पिटिटिव्ह इंडेक्समध्ये भारताची क्रमवारी सुधारली आहे. 2013 साली भारताचा क्रमांक 65 होता तो आता 2017 साली 25 वर गेला आहे.