पेडणे (गोवा) : जमावाच्या अमानुष मारहाणीत एका अमेरिकन पर्यटकाचा मृत्यू झाल्याची घटना उत्तर गोव्यातील तुमवाडा, कोरगाव येथे मंगळवारी घडली. कायतान व्हॉलते असे या ३० वर्षीय अमेरिकन युवकाचे नाव असून त्याला जमावाने चोर समजून मारहाण केल्याचे समजते.या प्रकरणी पेडणे पोलिसांनी तूर्त ‘अनैसर्गिक मृत्यू’ अशी नोंद केली आहे. पुढील चौकशी सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक देवेंद्र गाड यांनी दिली. नायजेरियन व्यक्तींशी झालेल्या भांडणामुळे कायताना बचावासाठी पळत सुटला.तो देऊळवाडा येथील एका घरात शिरला. घरातील लोकांनी आरडाओरडा केल्यामुळे तो पुन्हा बाजारपेठेत आला. तेथे एका दुचाकीवर बसून त्याने मदतीची याचना केली. मात्र, तो दुचाकी पळवण्यासाठी आल्याची समजूत झाल्याने लोक त्याच्या मागे लागले. तुमवाडा - कोरगाव येथे पोहोचल्यावर कायतान याने तेथेच असलेली सायकल चालवत पुढे जाण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळी पोलीस पोहोचले, तेव्हा कायतान जमावाच्या तडाख्यात सापडला होता. पोलीस निष्क्रियपणे सर्व प्रकार पाहात असतानाच तो जमावाच्या हातून सुटला व शेजारील शेतीच्या बांधावरून धावत सुटला. तोल जाऊन तो वायंगणी शेतीसाठी तयार केलेल्या चिखलात पडला. तेथे काही जणांनी त्याला मारहाण केल्याचे समजते. काही वेळाने आपत्कालीन सेवा वाहनातून तुये येथील आरोग्य केंद्रात आणले असता त्याला मृत घोषित करण्यात आले. चिखलात गुदमरल्यामुळे कायतानचा अंत झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. काय घडले?- कायतान याचे हरमल येथे तीन नायजेरियन व्यक्तींशी भांडण झाले. नायजेरियनांपासून बचावासाठी तो कोरगावच्या दिशेने पळत सुटला.- मदतीची याचना करत तो एका दुचाकीवर बसला परंतु लोकांना तो चोर असल्याचे वाटले आणि लोक त्याच्या मागे लागले.
विदेशी पर्यटकाचा गोव्यात मृत्यू
By admin | Published: January 14, 2016 12:31 AM