ऑनलाइन लोकमत -
राजस्थान, दि. ५ - अजमेरमध्ये स्पॅनिश दांपत्यावर हल्ला करण्यात आला आहे. पिडीत महिलेने काही स्थानिकांनी विनयभंग केल्याचा तसंच तिच्या पतीला मारहाण केल्याचा आरोप केला आहे. पुष्करमधील मंदिरात जात असताना हा हल्ला करण्यात आला. हल्यात महिलेचा पती जखमी झाला असून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलिसांनी जबाब नोंदवला असून आरोपींची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.
आम्ही भाड्याने बाईक घेतली होती आणि बाईकवरुन पुष्करला मंदिरात चाललो होतो. तेव्हा रस्त्यात काही लोकांनी आम्हाला अडवलं आणि मारहाण केली असल्याचं पिडीत दांपत्याने सांगितलं आहे. आरोपींनी बॅग खेचली तसंच कपडेदेखील फाडले असल्याचा आरोप पिडीत महिलेने केला आहे. महिलेच्या पतीने आरोपींना अडवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी दगडाने डोक्यावर हल्ला केला. ज्या हॉटेलमध्ये हे दांपत्य राहत होते तेथील मॅनेजरने त्यांना रुग्णालयात भरती केलं.
पोलिसांनी आरोपी दारुच्या नशेत होते अशी माहिती दिली आहे. तसंच आरोपींची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत असून लवकरच कारवाई करण्यात येईल असं सांगितलं आहे.