ऑनलाइन लोकमत
बंगळुरु, दि. 15 - भारतीय शास्त्रज्ञांनी स्वदेशी तंत्रज्ञानाने विकसित केलेले अॅवॉक्स टेहळणी विमान भारतीय हवाई दलात दाखल झाले आहे. 'नेत्र' असे या विमानाला नाव देण्यात आले असून, जगातील दुसरा मोठा एअर शो असलेल्या 'एरो इंडिया' मध्ये संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी हवाई दल अधिका-यांच्या ताब्यात हे विमान सोपवले. हवाई दलाच्या येलहंका तळावर हा छोटेखानी सोहळा पार पडला.
'नेत्र' मुळे हवाई दलाच्या क्षमतेमध्ये वाढ झाली असून, हवाई युध्दात हे विमान गेमचेंजर ठरेल. जमीन, पाणी आणि हवेमधून होणा-या हल्ल्याची माहिती मिळेल. शत्रूची क्षेपणास्त्रे, विमाने 300 कि.मी. अंतरावर असताना 'नेत्र'कडून नियंत्रण कक्षाला आगाऊ सूचना मिळेल. त्यामुळे हल्ला परतवून लावण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल.
डीआरडीओच्या नियंत्रणाखाली असलेल्या सेंटर फॉर एअरबॉर्न सिस्टीमने महिला वैज्ञानिक जे.मंजुला यांच्या नेतृत्वाखाली हे विमान विकसित केले आहे. महिला वैज्ञानिकांनी या विमानाच्या निर्मितीमध्ये महत्वाची भूमिका बजावली आहे. 'नेत्र'मुळे सध्या पाकिस्तानकडे जी क्षमता आहे त्यापेक्षा अत्याधुनिक तंत्रज्ञान भारताकडे उपलब्ध झाले आहे.