नवी दिल्ली: देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. गेल्या काही आठवड्यांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा खूप मोठा देशाच्या अर्थव्यवस्थेला बसला. लाखो लोकांचे रोजगार गेले. कित्येकांना पगार कपात सहन करावी लागली. मात्र याच कालावधीत मोदी सरकारला मोठा दिलासा मिळाला. देशाकडे असलेल्या परकीय गंगाजळीत खूप मोठी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे आता सरकारच्या तिजोरीत असलेल्या परकीय गंगाजळीनं विक्रम केला आहे.
सरकारच्या तिजोरीत सध्या ६०८.०८१ अब्ज डॉलर इतकी परकीय गंगाजळी आहे. आतापर्यंत कधीही सरकारच्या तिजोरीत इतक्या मोठ्या प्रमाणात परकीय गंगाजळी नव्हती. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं याबद्दलची माहिती काल दिली. ४ जून २०२१ रोजी संपलेल्या सप्ताहावेळी सरकारकडे ६०५.००८ अब्ज डॉलर इतकी गंगाजळी होती. यानंतर ११ जून रोजी संपलेल्या सप्ताहात हाच आकडा ६०८.०८१ अब्ज डॉलरवर जाऊन पोहोचला. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच परकीय गंगाजळी ६०० अब्ज डॉलरच्या पुढे पोहोचली आहे.अच्छे दिन येणार? आठवड्यात ५ ऐवजी ४ दिवसच काम करावं लागणार? मोदी सरकार नियम बदलण्याच्या तयारीत
याआधी २८ मे रोजी संपलेल्या सप्ताहात परकीय गंगाजळी ५९८.१६५ अब्ज डॉलरवर पोहोचली होती. पुढच्या आठवड्यात यात ६.८४२ अब्ज डॉलर्सची भर पडली. सरकारच्या तिजोरीतील एकूण रकमेच्या तुलनेत परकीय गंगाजळीचा वाटा लक्षणीय आहे. यामध्ये डॉलरसोबतच युरो, पाऊंड आणि येनचा समावेश आहे. देशातील सुवर्ण भंडारातही वाढ झाली आहे. सुवर्ण भंडारात ४९.६ कोटी डॉलरची भर पडली असून तो ३८.१०१ अब्ज डॉलरवर पोहोचला आहे. भारतानं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे जमा केलेल्या निधीतही १.१ कोटी डॉलरची भर पडली आहे. ही रक्कम आता ५.०११ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली आहे.