वाराणसी - प्रसिद्ध पत्रकार आतिश तासिर यांनी एका महंतांचा संदर्भ देत पंतप्रधान नरेंद्र मोदींवरमंदिर तोडण्याचा आरोप ठेवला आहे. तासिर यांनी वाराणसीच्या प्रसिद्ध काशी विश्वनाथ मंदिराचे फोटो शेअर करत ट्विट केलं आहे. त्यामध्ये, औरंगजेबाला तर विसरुनच जावा, काशी विश्वनाथ मंदिरातील एका महंतांनी असं म्हटलंय, असे लिहिलं आहे. तसेच, गझनीनंतर इतर कुठल्याही व्यक्तीने एवढे मंदिर तोडले नसतील जेवढे, मोदींनी तोडले आहेत, असे म्हटले आहे.
तासीर यांनी आपल्या ट्विटमध्ये पुढे म्हटले की, ते महंत वाराणसी येथे सरकारद्वारे बनविण्यात येत असलेल्या कॉरिडोअरसंदर्भात बोलत आहेत. केवळ एक स्मारक बनविण्यासाठी शहराचा आत्मा असलेल्या भागाला नष्ट करण्यात येत आहे, असे महंतांचे म्हणणे असल्याचेही तासीर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. वाराणसीतील प्रसिद्ध काशी विश्वनाथ मंदिराच्या कॉरिडोर बांधणीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. कॉरिडोअर बनविण्यासाठी या परिसरातील घरे आणि लहान-मोठी मंदिरे काढण्यात आली आहेत. गंगा नदीकाठच्या ललिता घाट आणि मणकर्णिका घाट येथून ते काशी विश्वनाथ मंदिरपर्यंत हा कॉरिडोअर बनविण्यात येत आहे. या निर्माण प्रक्रियेत ज्या लोकांची घरे पडली आहेत, ते या कॉरिडोअरला आपला विरोध दर्शवत आहेत. तसेच, मंदिर काढण्यात येत असल्याने अनेक महंत आणि पुजारीही नाराज असल्याचं समजते. मात्र, सरकारकडून केवळ अतिक्रमण हटविण्यात येत असल्याचं सागिंतलं जात आहे.