अमृतसर - अमृतसर येथील भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या आणि पंजाबच्या माजी आरोग्यमंत्री लक्ष्मीकांता चावला यांनी बुलेट ट्रेनवरुन मोदी सरकारला घरचा अहेर दिला. चावला यांनी अमृतसर ते अयोध्या असा प्रवास केला होता. या प्रवासातील खराब अनुभवानंतर चावला यांनी मोदी आणि रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना फटाकारलं आहे. भारतीय रेल्वेला 'अच्छे दिन' आले नसल्याचे त्यांनी एक व्हिडीओ शेअर करुन म्हटले आहे.
मोदी सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या बुलेट ट्रेनलाभाजपाच्या ज्येष्ठ महिला नेत्याने विरोध दर्शवला आहे. विशेष म्हणजे अगोदर भारतीय रेल्वे सुरळीत करा, प्रवाशांना त्यातून योग्य त्या सुविधा द्या अन् मग बुलेट ट्रेनचं स्वप्न पाहा, असे भाजपा नेत्या लक्ष्मीकांता चावला यांनी म्हटलंय. भाजपा नेत्या चावला 22 डिसेंबर रोजी अमृतसर येथून अयोध्येसाठी प्रवास करत होत्या. शरयू-युमना एक्सप्रेसमधून त्यांचा प्रवास सुरू होता. त्या, दरम्यान, चावला यांनी एक व्हिडीओ रेकॉर्ड करुन भारतीय रेल्वेच्या दयनीय अवस्थेबाबत चिंता व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे, या प्रवासात ट्रेन लेट झाल्यामुळे आपल्याला 9 तास उशिर झाल्याचंही त्यांनी सांगितलं. तसेच रेल्वे तिकीट तपास यंत्रणा, प्रवाशांना अनधिकृतपणे होणारी तिकीटांची विक्री, रेल्वेतील टॉयलेट सुविधा यांबाबतही त्यांनी व्हिडीओतून रेल्वेमंत्र्यांना प्रश्न विचारले आहेत. तसेच ताशी 120 ते 200 किमी प्रवासाची रेल्वे विसरून जा, पण अगोदर या रेल्वेचं काहीतरी करा. लोकं रस्त्यावर झोपतायेत, थंडीवाऱ्याचं कुडकुडतायंत. पण, त्यांना वेटींग रूममध्ये जागा मिळत नाही. कृपया, आपण याकडे गांभिर्याने पाहा, असा सल्लाही चावला यांनी मोदी आणि गोयल यांना दिला आहे.
मात्र, पंजाब भाजपाचे प्रमुख श्वेत मलिक यांनी चावला यांचे म्हणणे खोडून काढत, मोदी सरकार आल्यापासून अमृतसर रेल्वेमध्ये बऱ्याच सुधारणा झाल्याचं म्हटलंय.