झारखंड : झारखंडमध्ये विरोधी पक्षांची आघाडी सत्तेवर आल्यास शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ केले जाईल, असे आश्वासन काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी दिले.
झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी येथे झारखंड मुक्ती मोर्चाचे उमेदवार कितुबुद्दीन शेख यांना पाठिंबा देणाºया प्रचार सभेत गांधी म्हणाले की, काँग्रेस-झारखंड मुक्ती मोर्चा-राष्ट्रीय जनता दल यांच्या आघाडीने बहुमत मिळवल्यास शेतकºयांना भाताच्या प्रत्येक क्विंटलमागे २,५०० रुपये किमान आधारभूत भाव मिळेल.
विरोधकांच्या आघाडीचे पहिले प्राधान्य हे दोन लाख रुपयांपर्यंतचे शेतकºयांचे कर्ज माफ करण्यास असेल. छत्तीसगड, राजस्थान आणि मध्यप्रदेशातील काँग्रेसच्या सरकारांनी २,५०० रुपये किमान आधारभूत भावाने तांदूळ विकत घेतला तोच कित्ता झारखंडमध्येही आम्ही निवडणूक जिंकलो तर गिरवला जाईल, असे गांधी म्हणाले.
काँग्रेसने नेहमीच दिलेली आश्वासने पूर्ण केली आहेत, असे ठासून सांगून राहुल गांधी यांनी देशात बेरोजगारीत वाढ केल्याबद्दल केंद्रातील भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारवर टीका केली. आज बेरोजगारीचा दर हा गेल्या ४५ वर्षांतील सर्वात जास्त आहे. नोटाबंदीच्या निर्णयामुळे गरीब वर्गाला मोठा फटका बसल्याचे व आजही लोकांना त्यात भरडून निघावे लागत असल्याचे ते म्हणाले. तरीही भाजपचे सरकार केवळ १०-१५ उद्योगपतींच्या लाभांसाठी काम करीत आहे, असे त्यांनी सांगितले. राहुल गांधी यांची ही प्रचारसभा केवळ १० मिनिटे चालली.
६२ टक्के मतदान
रांची : झारखंड विधानसभेच्या तिसºया टप्प्यात १७ जागांच्या निवडणुकीसाठी ६२.३५ टक्के मतदान झाले. शहरी भागात झालेले हे मतदान शांततेत पार पडले. ५६ लाखांपेक्षा अधिक मतदारांनी ३०९ उमेदवारांच्या भवितव्याचा निर्णय ईव्हीएम यंत्रात बंदिस्त केला. मुख्य निवडणूक अधिकारी विनय कुमार चौबे यांनी सांगितले की, सायंकाळी मतदान संपेपर्यंत ६२.३५ टक्के मतदान झाले. कोठेही अनुचित प्रकार घडल्याची नोंद नाही.