नवी दिल्ली : लोकपाल स्थापन करण्यात आल्यानंतर तब्बल अकरा महिन्यांनी सरकारने भ्रष्टाचारप्रकरणी तक्रार दाखल करण्यासाठी प्रारूप जारी केले आहे. सर्व तक्रारदारांना बिगर-न्यायिक मुद्रांकपत्रात प्रतिज्ञापत्र द्यावे लागेल. खोटी आणि आकसपणाने केलेली वा क्षुल्लक तक्रार दंडनीय असेल. त्यातहत एक वर्षे तुरुंगवासाची शिक्षा आणि एक लाखापर्यंत दंड केला जाईल.लोकपालांनी ठरवून दिलेल्या पद्धतीने इंग्रजीत इलेक्ट्रॉनिक स्वरूपात, टपाल किंवा व्यक्तिश: तक्रार करता येईल. इलेक्ट्रॉनिक स्वरूपात दाखल करण्यात तक्रारीची प्रत १५ दिवसांच्या आत लोकपालांकडे सादर करणे जरूरी आहे, असे कर्मिक मंत्रालयाने जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे.इलेक्ट्रॉनिक माध्यमातून करण्यात आलेली तक्रार सर्व पैलूंनी परिपूर्ण असल्यास तक्रार प्रलंबित ठेवली जाणार नाही. हिंदी, गुजराती, आसामी आणि मराठीसह २२ भाषांपैकी कोणत्याही भाषेतील तक्रारींवर लोकपाल विचार करू शकते. तक्रारीत पंतप्रधानांसह सरकार कर्मचाऱ्यांविरुद्ध आरोपांबाबत तपशील असावा.स्वाक्षरित निवेदनाशिवाय तक्रारदारकडे विशेष प्रारूपात ओळखीसंबंधी पुराव्याची प्रत आणि कंपनी, संस्था, महामंडळ, मर्यादित भागीदारीची कंपनी, प्राधिकरण, सोसायटी, ट्रस्ट किंवा असोसिएशन तसेच व्यक्तीच्या वतीने तक्रार असल्यास संघटनेचे नोंदणी किंवा संस्थेचे प्रमाणपत्र असावे. सर्व तक्रारदारांचे विहित नमुन्यात प्रतिज्ञापत्र असणे जरूरी आहे. तीस दिवसांच्या आत लोकपाल तक्रार निकाली काढतील. तपास पूर्ण होईपर्यंत तक्रारदार आणि ज्यांच्याविरुद्ध तक्रार आहे, अशा व्यक्तींची ओळख लोकपालांना उघड करणार नाही. पंतप्रधानांविरुद्धच्या तक्रारीवर लोकपाल अध्यक्ष आणि सर्वसदस्यांचा समावेश असलेल्या पूर्ण पीठातर्फे निर्णय घेतला जाईल, असे आदेशात म्हटले आहे.
लोकपालांकडे तक्रार दाखल करण्याचे प्रारूप जारी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2020 5:30 AM