नवी दिल्ली: भारतीयकुस्ती महासंघ (WFI)बाबात एक महत्वाची माहिती समोर आली आहे. भारतीय ऑलिम्पिक संघटनेने कुस्तीच्या देखरेखीसाठी तीन सदस्यीय समिती स्थापन केली आहे.
त्रिसदस्यीय समिती कुस्ती संघटनेचे हे काम पाहणार आहे. ऑलिम्पिक असोसिएशनने ही समिती स्थापन केली आहे. भूपेंद्र सिंह बाजवा या समितीचे अध्यक्ष असतील, एमएम सौम्या आणि मंजुषा कुंवर यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणुकीपूर्वीही हीच समिती भारतीय कुस्ती महासंघावर लक्ष ठेवत होती, कारण माजी अध्यक्ष ब्रिजभूषण यांना निलंबित करण्यात आले होते. ही त्रिसदस्यीय समिती कुस्ती स्पर्धांसाठी खेळाडूंची निवड करणे, आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी खेळाडूंच्या प्रवेशिका जमा करणे, क्रीडा उपक्रमांचे आयोजन करणे, बँक खाती हाताळणे, वेबसाइट व्यवस्थापित करण्याचे काम बघणार आहे.
भारतीय कुस्ती महासंघ गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. नुकतेच क्रीडा मंत्रालयाने या संघटनेला निलंबित केले होते. डब्ल्यूएफआयमध्ये वेगवेगळ्या पदांसाठी झालेल्या निवडणुकीत संजय सिंह यांनी अध्यक्षपद पटकावले होते. यानंतर बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि विनेश फोगट यांच्यासह काही दिग्गज कुस्तीपटूंनी संजय सिंह हे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या जवळचे होते. ब्रिजभूषण यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप आहेत, त्याविरोधात कुस्तीपटू संपावर देखील बसले होते.