नवी दिल्ली: मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी गेल्या अनेक महिन्यांपासून तिहार तुरुंगात कैद असलेले दिल्ली सरकारचे माजी मंत्री सत्येंद्र जैन यांना सोमवारी सफदरजंग रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. सत्येंद्र जैन यांचा हॉस्पिटलमध्ये बसलेला एक फोटो समोर आला होता, ज्यामध्ये ते खूपच अशक्त दिसत होते. हा फोटो शेअर करत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर जोरदार टीका केली.
देव कधीच माफ करणार नाही...
सीएम केजरीवाल म्हणाले की, सत्येंद्र जैन यांच्या उत्तम आरोग्यासाठी मी देवाकडे प्रार्थना करतो. भाजप सरकारचा हा उद्दामपणा आणि दडपशाही दिल्ली आणि देशातील जनता चांगल्या प्रकारे पाहत आहे. अत्याचार करणार्यांना देवही कधीच माफ करणार नाही. या संघर्षात जनता आमच्या सोबत आहे, देव आमच्या पाठीशी आहे. आम्ही सरदार भगतसिंग यांचे शिष्य आहोत. अत्याचार, अन्याय आणि हुकूमशाहीविरुद्ध आमचा लढा सुरूच राहील.
याशिवाय दिल्ली सरकारमधील मंत्री सौरभ भारद्वाज यांनीही ट्विट करत भाजपवर टीका केली. ते म्हणाले की, दिल्लीची आरोग्य व्यवस्था सुधारणाऱ्या सत्येंद्र जैन यांच्यासोबत तुम्ही केलेल्या या गैरकृत्याबद्दल देव तुम्हाला माफ करणार नाही.
पाठीच्या कण्याची समस्यातिहार तुरुंगाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी माजी मंत्री सत्येंद्र जैन यांनी त्यांच्या पाठीच्या कण्यामध्ये समस्या असल्याचे सांगितले. यानंतर त्यांना तातडीने डीडीयू रुग्णालयात नेण्यात आले. तेथे तपासणी केल्यानंतर जैन यांनी सेकंड ऑपिनियन घेण्याची इच्छा व्यक्त केली, त्यानंतर त्यांना सफदरजंग रुग्णालयात नेण्यात आले.
35 किलो वज घटलेगेल्या आठवड्यात झालेल्या सुनावणीदरम्यान सत्येंद्र जैन यांच्या वकिलाने सर्वोच्च न्यायालयात सांगितले होते की, तुरुंगात सत्येंद्र जैन यांचे वजन जवळपास 35 किलोने कमी झाले आहे. त्यांची प्रकृती ठीक नाही. याआधी गुरुवारी (18 मे) सर्वोच्च न्यायालयाने सत्येंद्र जैन यांच्या जामीन याचिकेवर सुनावणी करताना अंमलबजावणी संचालनालयाकडून (ED) उत्तर मागितले होते. न्यायमूर्ती एएस बोपण्णा आणि हिमा कोहली यांच्या खंडपीठाने ईडीला नोटीस बजावताना जैन यांना न्यायालयाच्या सुट्टीतील खंडपीठात दिलासा देण्यासाठी अपील करण्याची मुभा दिली.