नवी दिल्ली - भाजपाकडून सेनादलांच्या पराक्रमाचे राजकारण होत असल्याचा आरोप करत माजी सैन्यप्रमुख आणि माजी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी थेट राष्ट्रपतींना पत्र पाठवल्याचे समोर आल्याने ऐन निवडणुकीच्या मोसमात मोठी राजकीय खळबळ उडाली आहे. मात्र आता या पत्रावरून माजी लष्करी अधिकाऱ्यांमध्येच दोन गट पडल्याचे दिसत आहे. त्यापैकी काही वरिष्ठ सैनिकी अधिकाऱ्यांनी आपण अशा प्रकारच्या पत्रावर सह्या केल्याचे वृत्त फेटाळून लावले आहे. तर काही अधिकाऱ्यांनी मात्र आपण पत्र वाचल्यानंतर त्याखाली आपल्या नावाचा समावेश करण्यास परवानगी दिल्याचे मान्य केले आहे. दरम्यान, अशा प्रकारचे कुठलेही पत्र आपल्यापर्यंत पोहोचले नसल्याचे राष्ट्रपती भवनाने म्हटले आहे. पहिल्यांदा मतदान करणाऱ्या मतदारांनी आपले मत पुलवामा हल्ल्यात शहिदांना आणि बालाकोट येथे एअरस्ट्राइक करणाऱ्या जवानांना समर्पित करावे, असे आवाहन नरेंद्र मोदी यांनी लातूर येथील आपल्या सभेत केले होते. त्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. तसेच लष्कातील अनेक माजी अधिकाऱ्यांनीही सैन्याच्या राजकीय वापराबाबत नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान, भाजपकजून भारतीय सैनिकांच्या बलिदानाचे राजकारण करण्यात येत असल्याचा आरोप विरोधकांनी केला असतानाच, माजी सेना प्रमुखासह निवृत्त अधिकाऱ्यांनी याबाबत राष्ट्रपती यांना पत्र लिहल्याचे वृत्त आले होते. तीन माजी सेनाप्रमुख आणि 156 अधिकाऱ्यांनी हे पत्र लिहिल्याचे सांगण्यात येत होते. मात्र या पत्रात उल्लेख असलेले माजी सेना अधिकारी जनरल एस. एफ. रॉड्रिक्स यांनी तसेच माजी हवाई दलप्रमुख एन. सी. सुरी यांनी अशा प्रकारचे पत्र लिहिण्यास आणि त्यात आपल्या नावाचा समावेश करण्यास आपण सहमती दिली नसल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे मेजर जनरल हर्ष कक्कड यांनी आपण हे पत्र वाचल्यानंतर त्यात आपल्या नावाचा समावेश करण्यास परवानगी दिली होती असे म्हटले आहे. याशिवाय माजी लष्करप्रमुख शंकर रॉय चौधरी यांनीही अशा प्रकारचे पत्र लिहिल्याचे मान्य केले आहे.
लष्करी अधिकारी एस. एफ. रॉड्रिग्स यांनी अशा प्रकारचे कुठलेही पत्र लिहिल्याची माहिती नसल्याचे म्हटले आहे. लष्करी अधिकाऱ्यांच्या नावे फिरत असलेल्या एका पत्रामध्ये एस. एफ. रॉड्रिग्स यांचे नाव पहिल्या क्रमांकावर असल्याचे सांगण्यात येत आहे.