गुवाहाटी : आसामचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तरुण गोगोई यांचे सोमवारी निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. आसामचे आरोग्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मा यांनी तरूण गोगोई यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला.
तरूण गोगोई यांना काही दिवसांपूर्वी कोरोना व्हायरसची लागण झाली होती. त्यांनी कोरोनावर मात सुद्धा केली होती. मात्र, यानंतर त्यांची प्रकृती पुन्हा ढासळली. त्यामुळे त्यांच्यावर गुवाहाटी मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. तरूण गोगोई यांच्या शरीरातील अनेक अवयव निकामी झाले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला.
दरम्यान, माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांच्या प्रकृती बिघडल्याचे समजल्यानंतर आज सकाळीच आसामचे सध्याचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आपले सगळे कार्यक्रम रद्द केले होते. ताबडतोब ते डिब्रुगडहून गुवाहाटीकडे रवाना झाले. खुद्द ट्विट करून त्यांनी याबद्दल माहिती दिली होती. तरुण गोगोई हे नेहमीच माझ्यासाठी एका पित्यासमान राहिलेत. त्यांची प्रकृती सुधारण्यासाठी प्रार्थना करणाऱ्या लोकांमध्ये मीदेखील सहभागी होतोय, असे ट्विट सर्बानंद सोनोवाल यांनी केले होते.
तरुण गोगोई हे ईशान्य भारतातले काँग्रेसचे मोठे नेते होते. ते सहा वेळा लोकसभेत खासदार म्हणून निवडून गेले होते. सलग तीन वेळा मुख्यमंत्री होऊन १५ वर्षं सत्तेत असणारे ते या राज्याचे एकमेव नेते ठरले. सुरुवातीला आसामच्या जोरहाट मतदारसंघातून ते निवडणूक लढवत असत. त्यानंतर कालिबोरमधून ते निवडून आले. सध्या कालियाबोर मतदारसंघातून त्यांचा मुलगा गौरव गोगोई खासदार म्हणून निवडून आले आहेत.