Assam Ex CM Daughter Hitting Driver: आसामचे माजी मुख्यमंत्री प्रफुल्ल कुमार महंत यांच्या मुलीचा एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये माजी मुख्यमंत्र्यांची मुलगी तिच्या ड्रायव्हरला शिवीगाळ करताना आणि त्याला गुढघ्यावर बसवून चप्पलने मारताना दिसत आहे. या प्रकरणी स्पष्टीकरण देताना माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलीने ड्रायव्हर गैरवर्तणूक करत होता असं म्हटलं. मात्र आता ड्रायव्हरच्या तक्रारीनंतर माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आसामचे माजी मुख्यमंत्री प्रफुल्ल कुमार महंत यांची मुलगी प्रजोयिता कश्यप यांच्यावर ड्रायव्हरला चप्पलने मारहाण केल्याचा आरोप आहे. ड्रायव्हरने दारू पिऊन अनेक वेळा अश्लील विधानं केलं होतं. त्यामुळे त्याला मारहाण केल्याचे प्रजोयिता कश्यप यांनी म्हटलं. आसामची राजधानी दिसपूरच्या एमएलए हॉस्टेलमध्ये हा सगळा धक्कादायक प्रकार घडला. ड्रायव्हरला मारहाण होत असताना बाकीचे लोक हा सगळा प्रकार पाहत होते.
माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलीचे स्पष्टीकरण
"व्हिडिओमध्ये दिसणारी व्यक्ती माझा ड्रायव्हर आहे जो बऱ्याच काळापासून आमच्या कुटुंबासाठी काम करत आहे. “तो नेहमी दारूच्या नशेत यायचा आणि माझ्यावर अश्लील टिप्पण्या करायच्या. हे सर्वांनाच माहीत आहे. आम्ही त्याला समजावण्याचा प्रयत्न केला आणि असे करू नको असं सांगितले. पण माझ्या घरी आल्यावर त्याने सर्व मर्यादा ओलांडल्या आणि जोरजोरात दार वाजवू लागला. स्वतःच्या बचावासाठी असं करणे चुकीचे असेल तर त्याबद्दल ती माफी मागते, असं प्रजोयिता यांनी सांगितले.
स्वतःच्या बचावासाठी असं करणे चुकीचे असेल तर त्याबद्दल ती माफी मागते, असेही प्रजोयिता म्हणाल्या. पोलिसात तक्रार का दिली नाही, असं विचारला असता प्रजोयिता यांनी यावर उत्तर दिले नाही. अशा प्रकरणांमध्ये केवळ महिलांनाच प्रश्न विचारले जातात, असं म्हटलं. त्यांनी ड्रायव्हरची माहिती देण्यास त्यांनी नकार दिला.
ड्रायव्हरने मांडली त्याची बाजू
दुसरीकडे, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ड्रायव्हरनेही आपली बाजू मांडली. नॉर्थइस्टलाइव्हच्या वृत्तानुसार, ड्रायव्हरने त्याच्यावरील आरोप फेटाळून लावले. “प्रजोयिता यांची गाडी चालवण्याबरोबरच मी त्यांच्यासाठी घरातील कामेही करायचो. त्यांनी यापूर्वीही त्यांच्या चालकांना त्रास दिला आहे, त्यामुळे अनेकांनी नोकरी सोडली आहे," असे ड्रायव्हरने म्हटलं.
दरम्यान, ड्रायव्हरने दाखल केलेल्या तक्रारीवरून दिसपूर पोलिसांनी प्रजोयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. प्रजोयिताने आमदार निवासाबाहेर ड्रायव्हरला चप्पलने मारहाण केल्याचा आरोप आहे. प्रजोयिताने ड्रायव्हरला गुडघे टेकून कान धरण्यास भाग पाडले होते. याप्रकरणी पोलीस प्रजोयिताला चौकशीसाठी बोलण्याची शक्यता आहे.